

The electricity supply of four and a half thousand defaulters has been disconnected
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा परिमंडलातील सव्वाचार लाखांहून अधिक ग्राहकांकडे थकीत २८५ कोटीच्या वसुलीसाठी महावितरणने धडक मोहीम सुरू केली आहे. डिसेंबर महिन्यात ४ हजार ६०५ थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
ग्राहकांनी चालू बिलासह थकबाकी भरून सहकार्य करावे आणि वीज पुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर छत्रपती संभाजीनगर परिमंडलात वर्गवारीतील ४ लाख ३३ हजार ६५९ ग्राहकांकडे २८५ कोटी ७७ लाख रुपयांची वीज बिल थकबाकी आहे.
यात छत्रपती संभाजीनगर शहर मंडलातील १ लाख १० हजार १६ ग्राहकांकडे ६० कोटी ८१ लाख, ग्रामीण मंडलातील १ लाख ८९ हजार ९४३ ग्राहकांकडे ७७ कोटी ८८ लाख व जालना मंडलातील १ लाख ३३ हजार ७०० ग्राहकांकडे १४७ कोटी ८ लाख रुपयांची थकबाकी आहे. वसुलीसाठी छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील शहर, ग्रामीण व जालना मंडलात महावितरणतर्फे धडक वसुली मोहीम सुरू करण्यात आलेली आहे.
मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते, तांत्रिक कर्मचारी या मोहिमेत प्रत्यक्ष ग्राहकांकडे भेट देऊन थकबाकी वसुली करत आहेत.
डिसेंबर महिन्यात छत्रपती संभाजीनगर शहर मंडलातील ३ हजार ३८, ग्रामीण मंडलातील ८४१ व जालना मंडलातील ७२६ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. सुटीच्या दिवशीही ही मोहीम सुरू आहे. ग्राहकांनी थकबाकी व चालू वीजबिले भरून सहकार्य करावे व संभाव्य कारवाई टाळावी, असे आवाहन परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे.
बिल भरण्यासाठी पर्याय
बिलांसाठी महावितरणने अधिकृत वीज बिल भरणा केंद्रांसह विविध ऑनलाईन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. वीज बिलावरील क्यूआर कोड, महावितरण मोबाईल अॅप, संकेतस्थळ तसेच विविध यूपीआय अॅपद्वारे घरबसल्या ऑनलाईन वीज बिल भरता येते. वेळेत ऑनलाईन वीज बिल भरल्यास ०.२५ टक्के सूटही मिळते.
कारवाई सुरुच राहणार
वर्ष संपण्यास काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. नवीन वर्षात कमीत की थकबाकी दिसावी यासाठी अधिकारी, कर्मचारी प्रयत्नशील आहेत. ही कारवाई प्रभावीपणे राबवण्यासाठी अशीच सुरु ठेवण्यात येणार आहे. वीजपुरवठा खंडीत बरोबरच विज चोरांवरही कडक कारवाई करण्यात येणार आहे.