

Attack on Chief Justice; Work stoppage movement of lawyers union
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी (दि. १३) जिल्हा वकील संघ, मराठवाडा लेबर लॉ प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ लायर्स यांच्या वतीने शहरातील सर्व न्यायालयांमध्ये काम बंद आंदोलन करण्यात आले.
सरन्यायाधीश गवई यांच्यावरील हल्याच्या निषेधार्थ काम बंद ठेवणार असल्याचे जिल्हा वकील संघाने जिल्हा व सत्र न्यायाधीशांना तसेच अन्य संघटनांनी औद्योगिक न्यायालय सदस्यांना या आंदोलनाबाबत कळविले होते. त्यामुळे जिल्हा न्यायालय, कामगार व औद्योगिक न्यायालयाचे कामकाज सोमवारी दिवसभर पूर्णपणे बंद राहिले.
न्यायालय परिसरात आयोजित निषेध सभेत वकिलांनी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. यावेळी वकिलांनी म्हटले की, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला हा केवळ व्यक्तीवर नाही, तर संपूर्ण न्यायव्यवस्थेवर आणि संविधानावर हल्ला आहे. अशा कृत्यांना माफ केल्यास भविष्यात आणखी असे प्रकार घडू शकतात, त्यामुळे आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सभेतून करण्यात आली. बार कौन्सिल ऑफ इंडियाने संबंधित वकिलाची सनद निलंबित केल्याबद्दल समाधानही व्यक्त करण्यात आले.
या निषेध सभेत जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. अशोक मुळे, सेक्रेटरी अॅड. योगेश तुपे, अॅड. अमोल घोडेगाव, लेबर लॉ असोसिएशनचे सेक्रेटरी अॅड. अभय टाकसाळ, उपाध्यक्ष अॅड. अनिल सुरवसे, कोषाध्यक्ष अॅड. राजेश खंडेलवाल, इंडस्ट्रियल असोसिएशनचे सेक्रेटरी अॅड. विनोद पवार, अॅड. आनंद चावरे तसेच ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सोमनाथ लड्डा, अॅड. के.सी. डोंगरे, अॅड. राजेंद्र मुगदिया यांच्यासह मोठ्या संख्येने वकिल उपस्थित होते.