

Sambhajinagar Municipal Reservation
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदा तसेच नगरपालिकांच्या आरक्षण, प्रभाग रचना व मतदारसंबंधी खंडपीठात दाखल याचिकांवर १६ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती यांची प्रभाग रचना तसेच आरक्षण त्याचप्रमाणे नगरपालिकांच्या प्रभाग रचना व आरक्षणासंबंधी तसेच मतदार यादीसंदर्भामध्ये औरंगाबाद खंडपीठामध्ये अनेक याचिका सादर झालेल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने राहुल रमेश वाघ व इतर या प्रकरणांमध्ये दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या आदे शाप्रमाणे मुंबई नागपूर व औरंगाबाद तसेच कोल्हापूर या ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समित्या तसेच नगरपालिका व महानगरपालिका यांच्या निवडणुकांमधील प्रभाग रचना, आरक्षण इत्यादीसंदर्भात सादर झालेल्या याचिका एकत्र ऐकण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोग तसेच राज्य शासन यांनी मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडे अर्ज करावा व मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीनी त्यावर आदेश पारित करावा, असे निर्देश दिले होते.
यासंदर्भात पूर्वी काही याचिका सादर झाल्या असता दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी औरंगाबाद खंडपीठाने आदेश पारित करून या सर्व याचिका कोणत्या खंडपीठासमोर वर्ग करावयाच्या याविषयी माननीय मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडे राज्य शासनाने अर्ज सादर करावा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने मुख्य न्यायमूर्ती यांच्याकडे अर्ज सादर केला होता.
आज सादर झालेल्या व सुनावणीस असलेल्या याचिकांदरम्यान सर्व याचिकांची सुनावणी एकत्र घेण्याबाबत मुख्य न्यायमूर्ती यांच्याकडे शासनाने अर्ज सादर केला असल्याचे मुख्य सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच नव्याने सादर झालेल्या याचिकांबाबतही असाच अर्ज सादर करून योग्य ते आदेश प्राप्त करून घेण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्या. विभा कंणकणवाडी व न्या. हितेन वेनेगावकर यांच्या खंडपीठाने सर्व प्रकरणांची सुनावणी दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत तहकूब केली. सदर प्रकरणात याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. देवदत्त पालोदकर, अॅड. व्ही. डी साळुंखे, अॅड. सुरेखा महाजन यांनी तर राज्य निवडणूक आयोगातर्फे अॅड. सचिंद्र शेटे यांनी काम पाहिले.