

Twelve hundred domestic and foreign companies have booked for the expo.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा नवीन वर्षी ऑरिक सिटीच्या आवारात २७.५ एकर क्षेत्रात अॅडव्हान्टेज महा. एक्स्पो -२०२६ होणार आहे. याठिकाणी १५०० स्टॉल्स पैकी देशी-विदेशी कंपन्यांनी १२०० स्टॉल बुक केले आहेत. यात विदेशातील अनेक उद्योजक त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन लावणार आहेत. तसेच सामंजस्य करारही होणार असल्याने यातून उद्योगनगरी म्हणजेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची भरभराट होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.
टोयाटा-किर्लोस्कर, जेएसडब्ल्यू, अथर सह येऊ घातलेल्या अनेक कंपन्यांमुळे औद्योगिकनगरीला पुन्हा सुवर्णयुग येत आहे. यासोबतच आता मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चर (मसिआ), ऑरिक सिटी आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या सहयोगातून ८ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत होणाऱ्या अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२६ या औद्योगिक प्रदर्शनामुळेही उद्योगांना चालना मिळणार आहे.
या एक्स्पोत देशविदेशांतील अनेक उद्योजक आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन लावणार आहेत. तसेच येथे सामंजस्य करार, चर्चासत्रे आदी होणार आहेत. मसिआच्या माध्यमातून या एक्सपोची सध्या तयारी सुरू आहे. नुकतेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या एक्स्पोच्या पूर्वतयारीचा आढावा घेत येण्या-जाण्याचे मार्ग, वैद्यकीय, अग्निशमन, इंटरनेट, नियंत्रण कक्ष, हेल्पलाईन सुविधांसाठी प्रशासनाच्या सहयोगाचे निर्देश दिल्याचे प्रदर्शनाचे समन्वयक अनिल पाटील यांनी सांगितले.
या एक्स्पोसाठी जपान, तैवान, कोरिया, युरोपसह दिल्ली, बंगळुरू, पुणे अशा देशविदेशांतील १२०० कंपन्यांनी नोंदणी केली आहे. ऑटोमोबाईल, कृषी, टेक्सटाईल, फुड, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक, पर्यटन अशा विविध उद्योग क्षेत्रातील स्टॉल असणार आहे.