

Sambhajinagar Chhawa Sanghatana protests in support of Vijay Ghadge
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांच्यावर लातूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभरात संतापाची लाट उसळली असून, छत्रपती संभाजीनगरात याचे तीव्र पडसाद उमटले. सोमवारी (दि.२१) क्रांती चौकात छावाच्या विविध संघटना, मराठा संघटना व इतर समविचारी संघटनांनी राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात निदर्शने करत संताप व्यक्त केला.
या निदर्शनात शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री माणिकाराव कोकाटे आणि सुरज चव्हाण यांच्या पोस्टरला जोडे मारण्यात आले.
पोस्टरला असणाऱ्या पोस्टर फाडण्यात आली. तसेच शेतकऱ्यांचे अस्त्र आसुडाने फटके ही देण्यात आली. दरम्यान आंदोलकांनी सुरज चव्हाण यांना तात्काळ अटक करण्याची कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास बारामतीसह राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला. तसेच काही युवक गळ्यात पत्त्यांची माळ घालून आले होते, तर काहींनी रस्त्यावर पत्ते टाकून निषेध व्यक्त केला. काही काळ रस्ते अडवण्याचाही प्रयत्न झाला. तसेच काही आंदोलकांनी क्रांती चौकातील उड्डाणपुलावर चढून फेकत संताप व्यक्त केला. पत्ते खाली दरम्यान, क्रांती चौकाजवळ लावलेले राष्ट्रवादीच्या 'निर्धार नव पर्व' कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे बॅनरही कार्यकर्त्यांनी फाडले.
यापूर्वी संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला झाला होता. त्यानंतर आता छावा संघटनेचे विजय घाडगे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे राज्यातील पुरोगामी चळवळीतील नेतृत्व आणि विशेषतः मराठा संघटना पुन्हा एकदा टार्गेट केल्या जात असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली.
क्रांती चौकातील झाशीची राणी पुतळ्याजवळील देवगिरी बँकेजवळ विनापरवाना एकत्र येऊन खासदार सुनील तटकरे व अजित पवार यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संवाद मेळाव्याचे बॅनर फाडल्याप्रकरणी ज्ञानेश्वर गायकवाड, नितीन कदम, नीलेश धस, रवींद्र काळे आणि दीपाली बोरसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
रम्मी खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या! विजय घाडगे तुम आगे बडो, हम तुम्हारे साथ है, अण्णासाहेब जावळे, आम्ही तुमचे मावळे ! अशा घोषणांनी क्रांती चौक दणाणून गेला.