

Angry activists present on Guardian Minister's bungalow in Sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
शिवसेनेची उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज उमेदवारासह त्याच्या समर्थकांनी बुधवारी (दि.३१) पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर धडक दिली. न्याय देण्याची मागणी करत यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर मंत्री शिरसाट यांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून त्यांची समजूत काढली.
महापालिका निवडणुकीत उमेदवारीवरून सर्वच पक्षांत नाराजीनाट्य बघायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर मोर्चा काढला होता.
हा प्रकार ताजा असताना बुधवारी पुन्हा एकदा प्रभाग २० मधील एका इच्छुक उमेदवारासह त्याच्या कार्यकत्यांनी शिरसाट यांचा बंगला गाठला. प्रभाग २० ड मधून सुनील सोन-वणे हे शिवसेनेकडून लढण्यासाठी इच्छुक होते, परंतु त्यांच्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज सोनवणे आणि त्यांचे समर्थक शिरसाट यांच्या घरी पोहोचले.
शिरसाट यांच्या बंगल्यासमोर या कार्यकर्त्यांनी न्याय द्या, न्याय द्या अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर शिरसाट यांनी सुनील सोनवणे यांच्यासह काही कार्यकत्यांना आत बोलावून चर्चा केली. शेवटी सोनवणे यांनी शिरसाट यांच्यासह बाहेर येऊन आपली नाराजी दूर झाल्याचे जाहीर केले.
भाजप कार्यकर्तीच्या कुटुंबात उमेदवारी सोनवणे यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु शिवसेनेने हे आश्वासन पाळले नाही. ऐनवेळी भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्तीच्या पतीला उमेदवारी देण्यात आली, असा आरोप सोनवणे यांच्या समर्थकांनी यावेळी केला.
घोषणाबाजी करताना महिलेला भोवळ नाराज कार्यकर्त्यांनी मंत्री शिरसाट यांच्या बंगल्यासमोर सुमारे तासभर ठिय्या दिला. यादरम्यान, एका महिला कार्यकर्तीला भोवळ आली.
इतर महिलांनी लगेचच या महिलेला सांभाळले. त्यानंतरही ही महिला बंगल्यासमोर बसून होती. सोनवणे यांची शिरसाट यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच सर्व कार्यकर्ते घरी परतले.