Chhatrapati Sambhajinagar Municipal Election | कारागृहातून थेट निवडणूक कार्यालयात; खुनाच्या आरोपीने भरला उमेदवारी अर्ज
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (दि.३०) निवडणूक कार्यालय १ मध्ये खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी मुजीब सय्यद मोईनोद्दीन ऊर्फ मुजीब डॉन याने उमेदवारी अर्ज दाखल केला.
या उमेदवाराला पोलिस बंदोबस्तात हर्मूल कारागृहातून निवडणूक कार्यालयात आणण्यात आले होते, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी लतिफ पठाण यांनी दिली. महापालिकेच्या निवडणुकीसाठी दुपारी २ वाजता हर्मूल कारागृहात अटकेत असलेल्या पडेगाव येथील मुजीब सय्यद मोईनोद्दीन ऊर्फ मुजीब डॉन याला उमेदवारी दाखल करण्यासाठी स्मार्ट सिटी कार्यालयालगत असलेल्या घनकचरा विभागाच्या कार्यालयातील निवडणूक कार्यालयात आणण्यात आले. यावेळी कारागृह पोलिसांसोबतच शहर पोलिसही हजर होते. मुजीब याने ऑक्टोबर महिन्यात एका रिक्षा चालकाचा जुन्या वादातून खून केला होता. या आरोपात तो अटकेत आहे.

