

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
महायुतीची प्रतीक्षा न करता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने महापालिका निवडणुकीची रणनीती स्पष्ट करत ८० जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सलग दोन दिवस दोन उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर मंगळवारी (दि.३०) नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी पक्षाकडून उर्वरित प्रभागातील अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.
अजित पवार गटाच्या या निर्णयामुळे निवडणुकीतील समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून उमेदवार निवडीबाबत पक्षांतर्गत चर्चा, सर्वेक्षणे व स्थानिक पातळीवरील आढावे सुरू होते. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अनेक प्रभागांमध्ये चुरस वाढली होती.
अखेर पक्ष नेतृत्वाने स्थानिक ताकद, सामाजिक समतोल आणि निवडणूक जिंकण्याची क्षमता या निकषांवर उमेदवारांची यादी अंतिम केली. सलग दोन दिवस दोन याद्या जाहीर केल्यानंतर पक्षाकडून अर्ज दाखलच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी उर्वरित प्रभागातील नावे जाहीर करत उमेदवारांना थेट मैदानात उतरवण्यात आले. या यादीत जुन्यांसह नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे.
उमेदवारांची ही यादी जाहीर होताच संबंधित प्रभागांमध्ये हालचालींना वेग आला आहे. उमेदवारांनी तातडीने अर्ज दाखल करत प्रचाराची तयारी सुरू केली आहे. यात पक्षाकडून ११५ पैकी ८० जागांवर लक्ष केंद्रित करून महापालिकेत निर्णायक भूमिका बजावण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
तसेच येत्या काही दिवसांत प्रचाराला अधिक गती देण्यात येणार असून, स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि जनतेच्या अपेक्षा यांना केंद्रस्थानी ठेवून निवडणूक लढवली जाणार असल्याचे पक्ष नेतृत्वाने स्पष्ट केले. या निर्णयामुळे महापालिका निवडणूक अधिकच रंगतदार होणार असल्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त करण्यात आली आहे.