

An elderly man was swindled out of a gold chain weighing two-and-a-half tolas by someone posing as a police officer
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : 'पुढे लोकांना चाकू मारण्याच्या घटना घडत आहेत, अंगावरील सोने काढून ठेवा' अशी भीती घालत तोतया पोलिसांनी ७७ वर्षीय वृद्धाची २३ ग्रॅमची सोनसाखळी लांबवली. ही घटना १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४:१५ वाजता केंब्रिज चौकापुढे चिकलठाण्याकडे जाणाऱ्या जालना रोडवरील लक्ष्मी लॉजजवळ घडली. याप्रकरणी बुधवारी (दि. २५) एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात दोन अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फाजलपुरा येथील रहिवासी त्रिबंक सखाराम नागवे (७७) हे वृत्तपत्र वितरणाचे काम करतात. १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वाचार वाजेच्या सुमारास ते पत्नी सुमनबाई यांच्यासोबत स्कुटीवरून एमआयडीसी शेंद्रा येथून घराकडे परतत होते.
केंब्रिज चौकापुढे जालना रोडवरील लक्ष्मी लॉजजवळील निंबाच्या झाडाजवळ पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी त्यांना अडवले. स्वतः पोलिस असल्याचे सांगत त्यांनी ओळखपत्र दाखवले आणि परिसरात चाकूहल्ल्याच्या घटना घडत असल्याची भीती घालून अंगावरील सोने काढून ठेवण्यास सांगितले. भामट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून नागवे यांनी गळ्यातील 'ओम' असलेली २३ ग्रॅम वजनाची सोनसाखळी काढून शर्टच्या वरच्या खिशात ठेवली.
मात्र, भामट्यांनी "खिशात ठेवलेली साखळी काढा आणि तिचा नंबर सांगा असे म्हणत ती हातात घेतली. त्यानंतर हातचलाखी करत कागदाच्या दोन पुड्या बांधल्या आणि एक पुडी नागवे यांच्या हातात देऊन दुसऱ्या पुडीतील खरी सोनसाखळी घेऊन दुचाकीवरून पसार झाले. नागवे यांनी पुडी उघडून पाहिली असता त्यात पायातील चांदीचा तुकडा आणि बारीक खडा असल्याचे दिसून आले. पुढील तपास हवालदार संतोष सोनवणे करत आहेत.