Chhatrapati Sambhajinagar Crime : गुन्ह्यांचे 'अर्धशतक' पूर्ण करणारा अमोल गलाटे जेरबंद

चेनस्नॅचिंगचे ८ गुन्हे उघड; तीन दुचाकीही चोरल्या, दोन साथीदार, सराफालाही अटक
Chhatrapati Sambhajinagar Crime  News
गुन्हे शाखेने अटक केलेले आरोपी व हस्तगत केलेला मुद्देमाल.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहरात मॉर्निंग वॉक, रात्री फेरफटका मारणाऱ्या किंवा मंदिरात जाणाऱ्या वृद्ध महिलांना टार्गेट करून त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या कुख्यात अमोल गलाटे टोळीच्या गुन्हे शाखेने अखेर मुसक्या आवळल्या. या टोळीकडून १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेल्या ४ दुचाकी असा ९ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. कुख्यात अमोलवर शहरातील विविध ठाण्यांतील ११ गुन्हे व यापूर्वीचे ४५ असे एकूण त्याच्यावर ५६ गुन्हे दाखल आहे.

अमोल वैजनाथ गलाटे (३३, रा. इंदिरानगर, गारखेडा), मंगेश वाल्मीक शहाणे (२५, रा. इंदिरानगर, गारखेडा), अल्ताफ मुबारक शेख (१९, रा. आनंदनगर, गारखेडा) आणि चोरीचे दागिने विकत घेणारा सराफा शेख सिराजुल हक शेख अनवर अली (३६, रा. जवाहर कॉलनी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी मंगळवारी (दि. १६) दिली.

Chhatrapati Sambhajinagar Crime  News
Sangli Crime : सांगली जिल्ह्यात गुंडांच्या टोळ्यांत पुन्हा भडका

दि. २० मे रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास पुंडलिकनगरच्या कारगिल मैदानाजवळ मॉर्निंग वॉक करणाऱ्या सुलभा सोमवंशी (५८) यांना या टोळीने चाकूचा धाक दाखवून गळ्यातील ३ तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावले होते. गुन्हे शाखेने तपास करताना तिसगाव ते मिटमिटा रोडवरील रेल्वे भुयारी मार्गाजवळ तिघांना ताब्यात घेतले. खाक्या दाखविताच ८ ठिकाणी मंगळसूत्र चोरीची कबुली दिली.

मंगेश शहाणे हा स्वतः सोनार असल्याने त्याला दागिन्यांची पारख होती. त्याने चोरीचे सोने ओळखीचा सराफा आरोपी शेख सिराजुलला विकल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सिराजुलकडून ८ मंगळसूत्र व चेन असा मुद्देमाल हस्तगत केला. पुंडलिकनगर (३), जवाहरनगर (४), चिकलठाणा, सिडको, एमआयडीसी वाळूज आणि सातारा प्रत्येकी १ गुन्हा असे एकूण ११ गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, सहायक आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक अर्जुन कदम, अभिजित चिखलीकर, राजेंद्र साळुंके, दिलीप मोदी, प्रकाश गायकवाड, योगेश गुप्ता, श्रीकांत काळे, मनोहर गीते, विक्रम खंडागळे, सागर पांढरे, संजय गावंडे आर्दीच्या पथकाने केली.

लॉजवर मौजमजा

चोरी करून मिळालेल्या पैशातून ही टोळी थेट जालना गाठत असे. तिथे लॉजवर मुक्काम ठोकून दारू आणि खाण्यापिण्यावर ते पैसे उडवायचे. तसेच अमोलच्या भावाची एमआयडीसी वाळूज भागात एक खोली असून, तिथेही ही टोळी अधूनमधून मुक्काम ठोकत असे.

Chhatrapati Sambhajinagar Crime  News
Chandrapur Burglary | आंतरराज्यीय घरफोडी टोळीचा पर्दाफाश; ५७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, मध्यप्रदेशातून चौघांना अटक

गुन्ह्याचे अर्धशतक पूर्ण

गलाटेवर यापूर्वीचे तब्बल ४५ गुन्हे दाखल असून, त्यात या ११ नव्या गुन्ह्यांची भर पडल्याने त्याने गुन्ह्यांचे 'अर्धशतक' पूर्ण केले आहे. त्याने २०१५ पासून २०२० पर्यंत अनेक घरफोड्या केल्या. त्यानंतर चोरी आणि लूटमारीचा मार्ग पत्करला. २०२१ मध्ये त्याला एमपीडीएच्या कारवाईत कारागृहात डांबले होते. त्यानंतर त्याने बाहेर येताच चेनस्नॅचिंग सुरु केली. या गुन्ह्यात तो अनेकवेळा जेलमध्ये जाऊन आलेला आहे. दोन महिन्यांपूर्वीच तो आणि मंगेश कारागृहातून बाहेर आले होते. त्यानंतर पुन्हा मंगळसूत्र चोरीचा सपाटा लावला होता. नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथेही या टोळीवर चेनस्नॅचिंगचे गुन्हे नोंद आहेत.

असा चालत होता टोळीचा कारभार

गलाटेला दुचाकी चालवता येत नसल्याने त्याने मंगेशला रायडर म्हणून सोबत घेतले. या दोघांनी मिळून ९ गुन्हे केले. नंतर त्यांनी अल्ताफलाही जोडीला घेतले. अल्ताफ हा पुंडलिकनगर ठाण्यात दाखल जीवघेण्या हल्ल्याच्या गुन्ह्यात फरार होता. त्याच्यावर यापूर्वीचे ६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर या टोळीने गुन्हे करण्यासाठी शहरातूनच दोन स्पोर्ट बाईक आणि एक दुचाकी चोरली होती. विशेष म्हणजे, चेनस्नॅचिंग केल्यानंतर आरोपी मंगेश हा दुसऱ्या दिवशी बातम्या वाचून पोलिस तपासाची माहिती घ्यायचा. कोण पोलिस मागावर आहेत, हे पाहण्यासाठी तो सर्व पोलिसांना सोशल मीडियावर फॉलो करत असे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news