Sangli Crime : सांगली जिल्ह्यात गुंडांच्या टोळ्यांत पुन्हा भडका

चाप कोण लावणार? : ‘हाण की बडीव’ एक कलमी कार्यक्रमाची आवश्यकता
तडीपार
तडीपार
Published on
Updated on

स्वप्निल पाटील

सांगली : सांगली, मिरज शहरांसह जिल्ह्यात गुन्हेगारी टोळ्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, हत्यारांसह दहशत, पिस्तूल तस्करी, असे कारनामे टोळ्यांकडून राजरोसपणे सुरू आहे.

सांगलीत दहा-बारा वर्षांपूर्वी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत नामचीन गुंडांच्या टोळ्या नेस्तनाबूत केल्या. त्यानंतर गेल्या काही वर्षात नव्याने उदयास आलेल्या टोळ्यांचा उपद्रव वाढला आहे. या फाळकूटदादांच्या टोळ्या मोडीत काढण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाईची गरज निर्माण आहे, ज्यामुळे खाकीची जरब वाढेल. त्यासाठी पोलिसांनीच आता ‘हाण की बडिव’ हा एककलमी कार्यक्रम हाती घ्यावा, अशी लोकभावना आहे.

सांगली जिल्ह्यात खुनाची अक्षरश: मालिका सुरू आहे. यामध्ये वैयक्तिक व टोळी युद्धातून जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यात दर चार दिवसाला एक खून होत असल्याचे आकडेवारी सांगते. गेल्या वर्षी मिरजेतील निखिल कलगुटगी याचा झालेला खून गाजला होता. त्याचा खून करणारी टोळी सध्या कारागृहात आहे. विशेष म्हणजे गुंडांच्या टोळ्याचे धाडस इतके वाढले आहे, की मिरज शासकीय रुग्णालयात पोलिस बंदोबस्तात आणलेल्या हल्लेखोरांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. पण तो फसला. त्यामुळे पोलिसांचा जीव भांड्यात पडला.

यानंतर सांगलीत मुळशी पॅटर्नचा थरार पहावयास मिळाला. वाढदिवसाच्या दिवशीत दलित महासंघाच्या मोहिते गटाचा संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते याचा घरात घुसून निर्घृण खून करण्यात आला. यावेळी चाकू लागल्याने एका हल्लेखोराचाही मृत्यू झाला. याच रागातून उत्तम मोहिते याच्या खुनावेळी हल्लेखोराला दुचाकीवरून सोडणार्‍या तरुणाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर ड्रममध्ये भरून त्याला विहिरीत फेकण्यात आले होते. त्यामुळे कधीकाळी एखाद्या सिनेमात दिसणाऱ्या, किंवा मुंबईच्या गुन्हेगारी जगतात घडणाऱ्या घटना आता सांगली, मिरजेत घडत आहेत. जत येथे दुहेरी हत्याकांडातील साक्षीदाराचा न्यायालयात साक्ष देण्यासाठी जात असताना अपहरण करून खून करण्यात आला. कर्नाटक हद्दीत त्याचा मृतदेह झाडाला लटविण्यात आला होता. अशा मोठ्या घटनांमुळे सांगली जिल्हा हादरून गेला आहे.

सांगली, मिरज शहरात आता नव्याने गुन्हेगारांच्या टोळ्या उदयास आल्या आहेत. यामध्ये अल्पवयीन तरुणांसह १८ ते ३५ वयोगटातील तरुणांचा समावेश आहे. अनेकांचे हात हत्यार तस्करी, पिस्तूल तस्करीमध्ये गुंतले आहेत. दोन महिन्यापूर्वी सांगली शहरासह धामणी गाव गोळीबाराने हादरले होते. सांगलीत वाढदिवसाच्या कारणातून भरचौकात गोळीबार झाला, तर धामणीमध्ये तस्करीसाठी आणलेल्या पिस्तूलची चाचणी घेत असताना गोळी उडाल्याने एकजण गंभीर जखमी झाला. त्यामुळे सांगली जिल्हा नेमका कोणत्या दिशेने निघाला आहे, असा प्रश्न उपस्थित होतो.

घरात खायला अन्न नाही... पण..

खून, खुनाचा प्रयत्न, यामध्ये गुरफटलेल्या काही गुन्हेगारांची स्थिती अत्यंत हलाखीची आहे. काहीजण झोपडपट्टीत राहतात. काही जणांची तर घरात खायला अन्न नाही, अशी स्थिती आहे. आई-वडील दिवसभर राबतात, त्यामुळे कशीबशी एकवेळ घरी चूल पेटते, अशी अवस्था. मग हे तरुण गुन्हेगारी क्षेत्रात इतके ‘माहीर’ कसे. खून, खुनाचा प्रयत्न करणार्‍या गुन्हेगारांना अभय कोण देते? त्यांना जामिनासाठी मदत कोण करते? जामिनासाठी मलई कोण देते? असे अनेक प्रश्न... त्यांना राजकीय अभय असल्याच्याही चर्चा आहेत.

खाकीतील कारभार्‍यांची साथ.. शहरात हद्दपार मोकाट...

गंभीर गुन्हे दाखल असल्याने सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार केले जाते. परंतु कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात ‘टिपर’ म्हणून याच गुन्हेगारांचा वापर खात्याकडून केला जातो. त्यामुळे त्यांचे चांगले ‘लागेबंधे’ निर्माण झालेले असतात. अशा गुंडांची हद्दपारी झाल्यानंतर खात्यातील काही कारभार्‍यांकडून ढिलाई केली जाते. एकमेकांचे ‘रिलेशन’ जपण्यासाठी त्यांना साथ दिली जाते. नेमके हेच चुकते. त्यामुळे हद्दपार गुन्हेगार शहरात मोकाट फिरताना दिसतात.

वर्चस्वासाठी टोळ्यांची उभारणी

अनेक फाळकूट गुंडांनी परिसरात वर्चस्व निर्माण करण्यासाठी टोळी निर्माण केली आहे. या फाळकूट गुंडाची दहशत मोडीत काढण्याची गरज आहे. आता काही पोलिस ठाण्यांनी गुंडाची वरात काढण्यास सुरुवात केली आहे, पण या टोळ्यांच्या समूळ उच्चाटनासाठी ठोस कारवाईची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news