

Along with Makariye, the BJP panel won in ward 17
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
महापालिका निवडणुकीतील चुरशीच्या लढतीत प्रभाग क्रमांक १७मध्ये भाजपने आपली ताकद दाखवून दिली. भाजपचे उमेदवार अनिल मकरिये यांच्यासह पॅनलमधील सर्व उमेदवारांनी १६ जानेवारी रोजी जाहीर झालेल्या निकालात विजय मिळवला.
या विजयाला केवळ राजकीय नव्हे, तर वैयक्तिक प्रतिष्ठेचेही विशेष महत्त्व होते. अनिल मकरिये यांच्या उमेदवारी अर्जावर मंत्री अतुल सावे यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली होती. मकरिये व सावे यांची मैत्री सर्वश्रुत असल्याने ही निवडणूक सावे यांच्यासाठीही प्रतिष्ठेची बनली होती. त्यामुळे केवळ मकरिये नव्हे, तर संपूर्ण पॅनल विजयी करण्याचे आव्हान भाजपसमोर होते.
महापालिका निवडणुकीतील निकालांनी अनेक समीकरणे बदलली असताना, प्रभाग क्रमांक १७ मध्ये भाजपने मात्र एकहाती वर्चस्व सिद्ध केले. प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात मात्र भाजपसमोर अडचणी उभ्या राहिल्या होत्या. उद्धवसेना व शिंदेसेनेचे उमेदवार रिंगणात उतरल्याने मतांचे विभाजन होईल, अशी चर्चा होती. त्यातच प्रभागातील धार्मिक मतदारांचे समीकरण विजयाच्या आड येईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. काही काळ मकरिये यांच्यासह पॅनल अडचणीत सापडते की काय, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात ऐकू येत होती.
या पार्श्वभूमीवर भाजपने प्रचारात आक्रमकता वाढवली. मंत्री अतुल सावे यांच्यासह खासदार डॉ. भागवत कराड यांनी प्रभागात पदयात्रा काढत थेट मतदारांशी संवाद साधला. स्थानिक प्रश्न, विकासकामांचा आढावा आणि भविष्यातील योजनांचे आश्वासन यामुळे प्रचाराला वेग आला. तसेच गुलमंडी परिसरात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री नितेश राणे यांच्या जाहीर सभांनी वातावरण तापवले.
या सभांमधून केंद्र व राज्य सरकारच्या कामगिरीवर भर देण्यात आला. या रणधुमाळीत उमेदवार व कार्यकर्त्यांनीही प्रयत्नांची पराकाष्ठा केली. घरोघरी भेटी, सातत्यपूर्ण संपर्क आणि शेवटच्या टप्प्यातील मतदारसंवाद यामुळे प्रभावी मतांची गोळाबेरीज झाली. अखेर मतमोजणीच्या दिवशी भाजप पॅनलने स्पष्ट आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केला. यावरून मित्रासाठी पणाला लागलेली प्रतिष्ठा राखत मंत्री सावे यांचे प्रयत्न यशस्वी ठरले, तर प्रभाग १७ मध्ये भाजपच्या संघटनशक्तीचा प्रभाव पुन्हा एकदा दिसून आला.