

The municipal hall is ready for the newly elected corporators
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या ५ वर्षांपासून प्रशासकीय राजवटीखाली असलेली महानगरपालिका आता पुन्हा लोकप्रतिनिधींच्या ताब्यात आली असून, प्रशासनाने महापालिकेच्या सर्वसाधारण सभागृहाचे रूपडे पूर्णपणे पालटले आहे. त्यासाठी सहा कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. बैठक व्यवस्था, ध्वनिक्षेपक यंत्रणेसह अद्ययावत सुविधांयुक्त सभागृह एखाद्या कार्पोरेट कार्यालयापेक्षा अधिक चकाचक करण्यात आले आहे.
महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली असून, यंदा प्रथमच प्रभागनुसार मतदान घेण्यात आले. यात २९ प्रभागांतून ११५ नगरसेवक निवडून आले असून, प्रशासनाने सभागृहात पाऊल ठेवणाऱ्या नगरसेवकांसाठी आधीच ते चकाचक करून ठेवले आहे. हे नूतनीकरण केवळ दिखाव्यासाठी नसून, बदलत्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेतलेली व्यवस्था म्हणून पाहिले जात आहे.
तसेच प्रत्येक नगरसेवकासाठी भविष्यात संगणकीय माध्यमातून कामकाज करता येईल, अशी सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे कागदांचे गठे, घोषणाबाजी आणि गोंधळ याऐवजी नियोजनबद्ध चर्चाना वाव मिळेल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. यापूर्वी सभागृहातील चर्चामध्ये आवाजाचा गोंधळ, घोषणांची स्पर्धा आणि एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप हे नेहमीचे चित्र होते.
आता मात्र अत्याधुनिक ध्वनिव्यवस्था बसवण्यात आल्याने प्रत्येक नगर सेवकाचा आवाज स्वतंत्रपणे ऐकू येणार आहे. नगर सेवकांची संख्या वाढल्याने आसनव्यवस्थेतही बदल करण्यात आले असून, सभागृह अधिक प्रशस्त करण्यात आले आहे. सभागृह पूर्णतः वातानुकूलित करण्यात आले असून, अंतर्गत सजावटीत आधुनिकतेचा ठसा उमटवण्यात आला आहे.
आरामदायी खुर्चा, आकर्षक प्रकाशयोजना आणि नियोजनबद्ध रचना यामुळे सभागृहाला सत्तेच्या केंद्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मुख्य सभागृहासोबतच महापौर, उपमहापौर तसेच विविध समित्यांच्या सभापतींच्या दालनांचेही नूतनीकरण करण्यात आले आहे. यासाठी सुमारे सत्तर लाख रुपयांहून अधिक निधी खर्च करण्यात आला आहे. या दालनांमधील सोयीसुविधांमुळे सत्ताधाऱ्यांचा थाट अधिक उठावदार झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सभागृहात पुन्हा एकदा रंगणार विकासावरच्या चर्चा
महापालिकेसाठी शहरवासीयांनी २९ प्रभागांतून ११५ नगरसेवकांना निवडून दिले आहे. त्यामुळे प्रशासकीय शांततेनंतर आता मनपाच्या प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे सभागृहात पुन्हा एकदा राजकीय संघर्ष, सत्तासमीकरणे आणि विकासावरच्या चर्चा रंगणार आहेत. सहा कोटींच्या या सुसज्ज दरबारात जनतेच्या प्रश्नांना किती वाचा फुटते, याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.