

857 constructions on Padegaon-Sharnapur road demolished
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा ऐतिहासिक देवगिरी किल्ला, वेरूळ लेणीसह घृष्णेश्वर आणि भद्रा मारुती मंदिराकडे जाणारा दौलताबाद रस्ता अखेर चौपदरीकरणासाठी सज्ज झाला आहे. या मार्गावर पडेगाव ते शरणापूर या ६० मीटर रस्त्याच्या रुंदीआड येणारी ८५७ बेकायदा बांधकामे गुरुवार, शुक्रवार (दि. ३ व ४) अशी दोन दिवस मोहीम राबवून भूईसपाट केली. यात २५ जेसीबी, ६ पोकलेन, १५ टिप्पर, दंगाकाबू पथक, वरुण पथक, रुग्णवाहिका, अग्निशमन बंबासह महापालिकेचे ३५० तर पोलिस विभागाचे २५० अशी ६०० कर्मचारी तैनात होते.
शहरातील एपीआय कॉर्नर ते केंब्रीज चौक, महानुभव आश्रम ते देवळाई चौक, महानुभव आश्रम ते नक्षत्रवाडी या तीन प्रमुख रस्त्यांवर कारवाई केल्यानंतर गुरुवारी महापालिकेचे पथक पडेगावात धडकले. पथकाने पहिल्या दिवसापासून या रस्त्यावरील चार ते पाच मजली बांधकामांवर हतोडा चालवण्यास सुरुवात केली. पडेगाव ते शरणापूर या ६ किलोमीटर रस्त्यावर दोन्ही बाजूंनी पहिल्या दिवशी ५८५ तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पथकाने दोन्ही बाजूंच्या २७२ अशा ८५७ मालमत्ता जमीनदोस्त केल्या. प्रमुख रस्त्यांवरील व रस्त्याच्या बाजूने सर्व्हिस रोडवर असलेली अनधिकृत व अतिक्रमित बांधकामे पाडण्याची कारवाई सुरू केली आहे. गुरुवार, शुक्रवार असे दोन दिवस पडेगाव-मिटमिटा भागात कारवाई करण्यात आली.
पडेगाव ते शरणापूर हा रस्ता राज्य महामार्ग असल्याने तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचा आहे. सध्या हा रस्ता दोन पदरी आहे. परंतु, सा.बां. ने या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या रस्त्यावर कारवाई करून रस्ता रुंदीकरणाआड येणारी बोकायदा बांधकामे पाडण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. या रस्त्यावरील ६० मीटर रुंदीआड येणारी बांधकामे काढण्यात आली आहेत. आता या ६० मीटरमध्ये पुन्हा बांधकामे होणार नाही, याची काळजी महापालिका घेणार आहे. त्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुभाजकापासून ३०-३० मीटर अंतरावर खांब रोवण्यात येणार असल्याचेही महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
पडेगाव मार्गावरील पाडापाडीनंतर आज शनिवारी आणि उद्या रविवारी मोहिमेला ब्रेक देण्यात आला आहे. त्यानंतर सोमवारपासून पुन्हा कारवाई सुरू केली जाणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पडेगाव रस्त्यावर अनेकांनी स्व मालकीच्या जागेत अनधिकृत बांधकाम करून काहींनी हॉटेल तर काहींनी दुकाने थाटली आहेत. महापालिकेने वारंवार गुंठेवारीची सूचना करूनही त्याकडे मालमत्ताधारकांनी दुर्लक्षच केले. अखेर कारवाई सुरू होताच मालमत्ताधारक गुंठेव-रीिसाठी सरसावत आहेत. एका व्यावसायिकाने तर कारवाईवेळीच जागेवर ३५ लाख रुपये भरून गुंठेवारीची तयारी दर्शविली.
पडेगाव-मिटमिटा रोडवर पाडापाडी झाल्यानंतर आता सोमवारी (दि.७) महापालिकेचे बुलडोझर सिडको बसस्थानक ते हसूल टी पॉइंट रस्त्यावर धडकणार आहे. त्यासोबतच मंगळवारी पथक हसूल टी पॉइंट ते दिल्लीगेट या मार्गावर कारवाई करणार आहे. या मार्गावरील बेकायदा बांधकामधारकांना स्वतःहून बांधकाम काढून घेण्याचे आवाहन मनपाद्वारे करण्यात येत आहे.
रस्ता रुंदीकरणात येणारी बहुतेक बांधकामे महापालिकेने पाडली आहेत. यात काहींनी नुकसानीपासून वाचण्यासाठी स्वतः पाडापाडी करून घेतो, त्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी केली. मात्र त्यांना वेळ न देता मार्किंग करून लागलीच त्यांच्या मालमतांना जोसीबी लावून पाडल्या. तर फौजी ढाबा, हॉटेल वुडलॉट चालकाला बांधकाम काढून घेण्यास वेळ दिल्याने परिसरातील नागरिकांत उलटसुलट चर्चा होती.
उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार प्रमुख मार्गावर ६० मीटर रुंदीत येणारी बेकायदा बांधकामे काढली जात आहेत. यात व्यावसायिक मालमत्ता लगेच पाडण्यात येत आहेत. तर सर्व्हिस रोडमधील निवासी बांधकामांना १५ ऑगस्टपर्यंत काढून घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.