

Alina Rizvi's bail plea rejected in ₹6 crore fraud case
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सहा कोटी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अलिना अनीस रिजवी हिची पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यानंतर तिने सादर केलेला नियमित जामीन अर्ज एमपीआयडी न्यायालयाचे विशेष न्यायाधीश निरंजन आर. नाईकवाडे यांनी फेटाळून लावला. आरोपीची भूमिका प्रथमदर्शनी गंभीर असून, मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याने तपास पूर्ण होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
प्रकरणात सलमान लियाकतखां पठाण यांनी फिर्याद दिली. त्यानुसार शेख रियाज यांनी परताव्याच्या आमिषाखाली ९ ते १२ टक्के व्याजदराने ठेवी घेण्यास फिर्यादीला प्रवृत्त केले व फिर्यादीकडून विविध वेळी एकूण ५ कोटी ७७ लाख ५७हजार १०३ रुपये घेतले. रियाज यांनी सांगितले होते की, त्यांचे सासरे सय्यद अनिस रिजवी यांचा दुबई येथे व्यवसाय असून, त्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल.
मात्र दीर्घकाळ लोटूनही परतावा न मिळाल्याने तक्रारदारांनी पैसे मागितले असता आरोपींनी रक्कम देण्यास नकार दिला. तसेच शेख रियाज यांनी आणखी दोन व्यक्तींनाही अशाच प्रकारे गुंतवणुकीचे आमिष दाखवून ३५ लाख रुपये घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकूण ६ कोटी ९ लाख ५७ हजार १०३ रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. प्रकरणात मुख्य आरोपी शेख रियाज गुलाम रब्बानी शेख, त्याची पत्नी अलिना अनीस रिजवी आणि अलिनाचे वडील अनिस रिजवी शेख यांच्याविरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने उपलब्ध कागदपत्रे, बँक व्यवहार, मनी ट्रेल, आरोपींची भूमिका आणि तपासाची सद्यस्थिती विचारात घेतली. आर्थिक गुन्ह्यांकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता अधोरेखित करत तपासात अडथळा येऊ नये म्हणून नियमित जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला.
या प्रकरणात फिर्यादीच्या वतीने अॅड. आनंद देशपांडे यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. आदेश वाटणे, अॅड. शैलेश आडे, अॅड. स्नेहल लिंगसे-काकडे, शावलीन चौधरी, प्राची चव्हाण आणि आकांक्षा गिरी यांनी सहकार्य केले.