

Agriculture Department Ready for the Kharif Season
कन्नड, पुढारी वृत्तसेवा : खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन विविध पिकांसाठी आवश्यक बियाण्यांचा मागणी अहवाल तयार करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार खरीप हंगामासाठी एकूण ९१ हजार २०० क्विटल बियाण्यांची आवश्यकता नोंदविण्यात आली असून, यामध्ये कापूस व मका पिकांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे.
अहवालानुसार संकरित कापूस पिकासाठी ४६ हजार ४६ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून त्यासाठी सुमारे १ लाख ९४ हजार पाकिटे बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. तसेच मका पिकासाठी ३६ हजार ७१५ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन करण्यात आले असून, यासाठी ६ हजार ७५० क्विटल बियाण्यांची गरज भासणार आहे.
याशिवाय तूर पिकासाठी २ हजार २१८ हेक्टर क्षेत्रासाठी ३०.६० किंवटल, मुगासाठी ५४.०५ क्विटल, उडदासाठी ८१ क्विटल, तर सोयाबीनसाठी ७५० विंवटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. संकरित बाजरीसाठी ३५ क्विटल, तर भुईमुगासाठी १०० क्विटल बियाण्यांची आवश्यकता दर्शविण्यात आली आहे.
कृषी विभागाकडून खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाण्यांचा तुटवडा भासू नये यासाठी नियोजन करण्यात येत असून, अधिकृत विक्रेत्यांकडे वेळेत बियाणे उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार असल्याचे समजते. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकरीही पेरणीपूर्व तयारीला लागल्याचे चित्र दिसून येत आहे.