

अरुण तम्मडवार
किनवट : यंदाच्या खरीप हंगामात किनवट तालुक्यात पेरणी क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, सुमारे ८० हजार ०३० हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी २८ हजार ८६५ मेट्रिक टन रासायनिक खतांसह कापूस व सोयाबीन बियाण्यांचे व्यापक नियोजन कृषी विभागाने केले आहे. सध्या तालुक्यात ११ हजार ५४६ मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध असून, त्याचे काटेकोर नियमन करण्यासाठी ई-तपासणी यंत्रणा राबविण्यात येत आहे.
गतवर्षी तालुक्यात ७९ हजार ९३२ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली होती. यंदा त्यात वाढ होऊन एकूण ८० हजार ०३० हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. तालुक्यातील १८१ परवानाधारक कृषी निविष्ठा केंद्रांमार्फत खत व बियाण्यांचा पुरवठा केला जाणार आहे.
यामध्ये युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी यांसारख्या सरळ खतांसह १० : २६ : २६, २० : २० : ० : १३, १४ : ३५ : १४, २४ : २४ : ० या संयुक्त खतांची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार युरिया १०,८९० मेट्रिक टन, डीएपी ३,२०० मेट्रिक टन, एमओपी १,५२० मेट्रिक टन, एसएसपी २,४८५ मेट्रिक टन तर संयुक्त खतांची १० हजार ७७० मेट्रिक टन अशी एकूण २८ हजार ८६५ मेट्रिक टन खतांची मागणी जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आली आहे. खरीप हंगामात तालुक्यात कापूस व सोयाबीन या नगदी पिकांवर शेतकऱ्यांचा भर असल्याने कापसाच्या ४७५ ग्रॅम वजनाच्या सुमारे २ लाख ३० हजार बियाण्यांच्या पाकिटांची तर १२ हजार ६३० क्विंटल सोयाबीन बियाण्यांची आवश्यकता निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय तूर ४५० क्विंटल, उडीद व मूग प्रत्येकी १२५ क्विंटल, मका २७० क्विंटल आणि ज्वारी ३६ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना वेळेवर खते व बियाणे उपलब्ध व्हावेत यासाठी कृषी विभागाने गावपातळीवर नियोजन सुरू केले असून, कृषी सेवा केंद्रांमार्फत पुरवठा सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, तालुक्यात होणारा खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी सध्याची ई-तपासणी केली जात असून, त्यासाठी भरारी पथकेही नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.
"आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खत पुरवठ्यात काही प्रमाणात अनिश्चितता असली तरी मागील वर्षाचा साठा उपलब्ध असल्याने यंदा मागणीत संतुलन राखण्यात आले आहे. सध्या तालुक्यात पुरेसा साठा उपलब्ध असून मंजुरीनंतर टप्प्याटप्प्याने पुरवठा केला जाईल. पेरणीच्या कालावधीत शेतकऱ्यांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी प्रशासन सज्ज असून परवानाधारक कृषी केंद्रांद्वारे नियमित विक्री सुरू आहे."
-चंद्रकांत निमोड, तालुका कृषी अधिकारी