

Electricity Bill
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा:
राज्यातील वीज ग्राहकांसाठी टप्प्याटप्प्याने सुमारे २६ टक्के वीज दर कमी करण्याचे घोषित केले आहे. त्याचबरोबर सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीज वापरावर अतिरिक्त सूट देण्यात येणार आहे. ही मात्र केवळ स्मार्ट मीटर (टीओडी) धारकांनाच मिळणार आहे. जुन्या मीटरधारकांना या सवलतीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान १ जुलैपासून मिळणारा दिलासा १ ते १०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्यांना मिळणार आहे. त्यापेक्षा जास्त वापर करणाऱ्याला मात्र दोन किंवा तीन वर्षे तरी वाट पाहावी लागणार आहे.
विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार १ जुलैपासून टप्प्याटप्प्याने वीज बिल कमी करण्यात येणार आहे. यात १ ते १०० युनिटपर्यंत ज्यांचा वापर आहे, त्यांना दिलासा मिळणार आहे. एक जुलैपासून त्यांना प्रतियुनिट ६ रुपये ३२ पैशांऐवजी प्रतियुनिट ५ रुपये ७४ पैसे मोजावे लागणार आहेत. तर १०१ ते ३०० युनिट वीज वापरणाऱ्याला १२ रुपये २३ पैशाच्या जागी १२ रुपये ५७ पैसे, तर ३०१ ते ५०० युनिटच्या ग्राहकांसाठी १६ रुपये ७७ पैशांऐवजी १६ रुपये ८५ पैसे. तसेच ५०० युनिटपेक्षा जास्त वीज वापरणाऱ्यांना १८ रुपये ९३ पैशांऐवजी १९ रुपये १५ पैसे मोजावे लागणार आहेत. म्हणजे १०० युनिटपेक्षा जास्त वीज वापरणाऱ्या तूर्त तरी दिलासा नाही.
स्मार्ट मीटरला जनतेकडून कडाडून विरोध होत आहे. विरोध होत असला तरी हे मीटर बसवण्यासाठी विविध कृल्प्त्या लढवल्या जात आहेत. त्यात नवीन कनेक्शनधारक, फॉल्टी मीटर अशांना स्मार्ट मीटर बसवून देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात सुमारे २६ हजार स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. हे मीटर वापरले तर सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान वापरण्यात आलेल्या युनिटवर १० टक्के अतिरिक्त सूट देण्याची घोषणा केली आहे. यात २०२५-२६ या वर्षात प्रतियुनिट ८० पैसे तर २०२६-२७ मध्ये ८५ पेसे, २०२७-२८-९० पैसे २०२८-२९ मध्ये ९५ पैसे २०२९-२०३० प्रतियुनिट १ रुपया अशी सूट देण्यात येणार आहे. असे असले तरी या मीटरला जनतेकडून मोठ्या प्रमाणात विरोध सुरू आहे.
अनेकांकडे जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवणे सुरू आहे. हे मीटर बसवल्यापासून दरमहा १५० ते २०० रुपयांचे अधिक बिल येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत, परंतु या तक्रारीत तथ्य नसून, हे मीटर जुन्या मीटर प्रमाणेच युनिट देत असल्याचा दावा महावितरणकडून करण्यात येत आहे.