

Action to remove encroachments on 55 properties on Golf Club Road
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
मिटमिटामार्गे मिसबाह कॉलनी गोल्फ क्लबदरम्यान ३० मीटर रस्त्यासाठी बुधवारी (दि. २६) महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने धडक मोहीम राबविली. या रुंदीकरणात बाधित होणाऱ्या ५५ मालमत्ता जेसीबीद्वारे भुईसपाट करण्यात आल्या. यात टीडीआरधारकांच्या जागांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे पोलिस बंदोबस्ताविनाच महापालिकेने नागरी मित्र पथकाच्या बंदोबस्तात मोहीम पूर्ण केली. या रस्त्याआड येणाऱ्या मशिदीला वाचविण्यासाठी एकाने स्वतःची ५० फूट जागा रस्त्यासाठी दिली.
मिटमिट्यातील मिसबाह कॉलनी ते एमजीएम गोल्फ क्लब मैदान हा २००१ सालच्या विकास आराखड्यातील २४ मीटर रुंदीचा मंजूर रस्ता नव्या विकास आरखड्यात ३० मीटर रुंद करण्यात आला आहे. १९९१ साली ही जागा नॉन डेव्हपमेंट झोन (एनडीझेड) होती. ग्रीन झोनमुळे या जमिनीवर उद्यानाचे आरक्षण होते, असे असतानाही अनधिकृतपणे प्लॉटिंग करून भूमाफियांनी प्लॉट विक्री केले. या जागेत टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या. मात्र २०२५ च्या मंजूर विकास आराखड्यामध्ये ही जमीन यलो झाली. उद्यानाचे आरक्षण उठविण्यासाठी आक्षेप नोंदविण्यात आला. परंतु अद्याप शासनाची मान्यताच मिळालेली नाही. दरम्यान, मनपाने टोटल स्टेशन सव्र्व्हे करून मिसबाह कॉलनीतील ५५ बाधित मालमत्ताधारकांना नोटीस बजावल्या होत्या.
या नोटीस मिळाल्यानंतर मालमत्ताधारकांनी स्वतःहून पाडापाडी केल्याचा बनाव केला. त्यामुळे बुधवारी महापालिकेचे पथक मिसबाह कॉलनीत धडकले. मालमत्ताधारकांचा विरोध झुगारून महापालिकेने कारवाई केली. त्यामुळे बाधित मालमत्ताधारकांचा विरोध मावळला. मोहिमेत पथकाने लहान मोठ्या ५५ मालमत्ता जमीनदोस्त केल्या. त्यात तीन मजली इमारतींचाही समावेश आहे. पाडापाडीची कारवाई अतिक्रमण विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे, सहायक आयुक्त संजय सुरडकर, झोन एकच्या सहायक आयुक्त सविता सोनवणे यांच्यासह पाच जेसीबी, नागरिक मित्र पथक उपस्थित होते. या रस्त्याचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे.
त्या' टीडीआरधारकांवरही कारवाई
यापूर्वी टीडीआर दिलेल्या जमिनी रस्त्यासाठी घेण्यात आल्या नाहीत, असा आरोप येथील नागरिकांनी मंगळवारी केला होता. त्यासाठी बुधवारी नगररचना विभागाचे उपसंचालक मनोज गर्जे, उपअभियंता कौस्तुभ भावे, नगरचनाकार राहुल मालखेडे हेही कारवाईच्या ठिकाणी उपस्थित होते. मोहिमेत टीडीआर दिलेल्यांच्या जमिनी रस्त्यासाठी घेण्यात आल्याने आरोप करणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
मशीद पाडण्याची अफवा
महापालिकेचे पथक मशीद आणि मदरसा पाडण्यासाठी आले, अशी अफवा बाधित मालमत्ताधारकांनी परिसरात पसरवली होती. त्यामुळे मोठा जमाव जमा झाला होता. याबाबत महापालिकेच्या पथकाला माहिती पडताच कारवाई गोल्फ क्लबपासून सुरू केली. त्यामुळे अनेक जण अवाक् झाले.