

A speeding car crushed a professor riding a bike
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पुतणीसह तिच्या मैत्रिणीला विद्यापीठात सोडून घराकडे परत निघालेल्या दुचाकीस्वार प्राध्यापकाला सुसाट कारचालकाने चिरडले. या अपघातात प्राध्यापक जागीच ठार झाला, तर त्यांची ३ वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात बुधवारी (दि.२६) रात्री पहाडसिंगपुऱ्यातील मशिदीजवळ घडला. प्रा. ज्ञानेश्वर तुकाराम शिरसाट (४०, रा. हसनापूर, पो. गोंदी, ता. अंबड, जि. जालना, ह.मु. पहाडसिंगपुरा) असे मृताचे नाव असून, त्यांची मुलगी आर्वीच्या पाठीचे हाड मोडून गंभीर जखमी झाल्याने तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अधिक माहितीनुसार, प्रा. ज्ञानेश्वर सिरसाट यांनी विद्यापीठातून पीएचडीची पदवी प्राप्त केल्यानंतर ते बदनापूर येथील एका महाविद्यालयात तासिका तत्वावर कार्यरत होते. त्यांची पुतणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बीए द्वितीय वर्षात शिकत असून, ती स्वाधार योजनेचा अर्ज भरण्यासाठी मैत्रिणीसह शिरसाट यांच्या पहाडसिंगपुरा येथील घरी आली होती.
प्रा. शिरसाट यांनी तिचा अर्ज भरून दिल्यानंतर दोघींना विद्यापीठात सोडण्यासाठी निघाले. दुचाकीने जाताना त्यांची तीन वर्षांची चिमुकली मुलगी त्यांच्यासोबत गेली. दोघींना विद्यापीठात सोडून घराकडे परतत असताना पहाडसिंगपुरा येथील मशिदीजवळ येताच समोरून आलेल्या सुसाट कारचालकाने (एमएच-२०- एचएच-८५५२) त्यांच्या दुचाकीला उडविले. दूरवर फरपटत नेत कार शिरसाट यांच्या अंगावरून गेल्याने ते ठार झाले. तर मुलगी आर्वी बाजूला फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झाली. बेगमपुरा पोलिसांनी धाव घेत नागरिकांच्या मदतीने त्यांना घाटीत नेले. मुलीला अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविले.
दरम्यान, प्रा. ज्ञानेश्वर शिरसाट यांची पत्नीही उच्चशिक्षित आहे. बुधवारी त्यांनी बीएडची परीक्षा दिल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. दरम्यान, अपघातग्रस्त वाहने बेगमपुरा ठाण्यात जमा करण्यात आली आहेत. कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, अशी माहिती बेगमपुरा पोलिसांनी दिली.
ब्रेक ऐवजी दाबले एक्सलेटर
शेख कलीम शेख नूर (३९, रा. कुंभारगल्ली, बेगमपुरा) असे आरोपी कार चालकाचे नाव असल्याची माहिती बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक मंगेश जगताप यांनी दिली. तो त्याच्या लहान दोन मुलांना घेऊन कार शिकण्यासाठी विद्यापीठाकडे निघाला होता. त्याने रस्त्यात प्रा. शिरसाट यांची दुचाकी समोर दिसताच ब्रेक ऐवजी एक्सलेटर दाबल्याने थेट शिरसाट यांना उडवून ते कारखाली चिरडले. चिमुकली आर्वी बाजूला फेकल्या गेल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.