पिशोर : कन्नड तालुक्यातील पिशोर येथून मध्यप्रदेशातील शारदा देवी मंदिर येथून पायी ज्योत आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या दुचाकीला चारचाकी वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने मंगळवारी (दि.०१) एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला. योगेश चंद्रभान डहाके (वय ४०, रा. पिशोर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. संतोष जगन सोनवणे (वय ३२) हा या अपघातात गंभीर जखमी झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिशोर येथून देशातील विविध ठिकाणी दरवर्षी नवरात्र उत्सवा निमित्त पायी ज्योत आणण्यासाठी तरुणांचा गट जात असतो. या वर्षी मध्यप्रदेशातील शारदा देवी येथून पायी ज्योत आणताना मंगळवारी सकाळी ०४:४५ वाजता मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्ह्याच्या बरगी पोलिस ठाणे हद्दीतील सुकरी गावाजवळ ज्योत साठी तेल वाहून नेणाऱ्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली.
या धडकेमध्ये योगेश याच्या डोक्याला पाठीमागून व समोरून गंभीर दुखापत झाली. यामध्ये जास्त रक्तस्राव होवून योगेश याचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेल्या संतोष सोनवणे हा सुद्धा डोक्याला मार लागून जखमी झाला. त्यांना लखनादोन सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. येथील डॉ.बी एस सोलंकी यांनी योगेश यास तपासून मृत घोषित केले तर जखमी संतोष वर उपचार करण्यात आले. योगेशच्या पश्चात आई, पत्नी, एक भाऊ, एक मुलगा, एक मुलगी, दोन बहिणी असा परिवार आहे.