तालुक्यातील अमरापूर येथी अविवाहित तरुणाचा वाढदिवशीच अपघातात मृत्यू झाला. या घटनेने शुभेच्छा फलक उतरून श्रद्धांजलीचे फलक लागल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अमरापूर येथील ज्ञानेश्वर उर्फ छोट्या बडे (वय 21) या अविवाहित तरुणाचा 15 ऑगस्ट रोजी वाढदिवस होता. त्या निमित्त त्याने ठिकठिकाणी स्वखर्चाने मोठे शुभेच्छा फलक उभारले होते. त्या फलकावर मान्यवरांसह गावातील काही मित्रांते फोटो होते. वाढदिवसाला डीजेच्या वाद्यात मिरवणूक, फटाक्यांची आतषबाजी, हार, गुच्छ, केक आणि शुभेच्छा देण्यास मान्यवरांची उपस्थिती असा एकंदर बेत होता.
वाढदिवसाच्या आदल्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत आणखी फलक लावले जात होते.. बारा वाजल्यानंतर वाढदिवसाचा शुभ दिवस सुरु होताच याच वेळी बडे हे एम.एच.23 बी.सी.4574 या चारचाकी वाहनाने वेगात येत असताना अमरापूर येथे वाहन रस्त्याच्या बाजूला असणार्या झाडाला धडकल्याने 12 वाजून 15 मिनिटांनी त्यांचा जागीच मृत्यु झाला. ही धडक एवढया जोराची होती कि वाहनातील एअरबॅग सुद्धा फुटली गेली.
वाढदिवसाचा दिवस सुरू होताच त्याच्या मृत्यूची घटना झाल्याने तत्काळ ठिकठिकाणी असणारे शुभेच्छाचाचे सर्व फलक खाली घेण्यात आले. त्या ठिकाणी श्रद्धांजलीचे फलक लागलेआहेत.