

ACB issues notice to District Supply Officer in bribery case
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रास्त भाव दुकानाचे निलंबन मागे घेण्यासाठी ७० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या गंगापूरच्या महिला पुरवठा निरीक्षक कांचन नामदेवराव कांबळे (३४, रा. रुबी इनसिग्निया अपार्टमेंट, हमालवाडा) यांना शनिवारी (दि.१४) एसीबीच्या पथकाने अटक केली.
त्याच्या जबाबात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे नाव समोर आल्याने एसीबीने प्रवीण फुलारी यांना चौकशीसाठी हजर होण्याची नोटीस बजावली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक वाल्मीक कोरे यांनी दिली. मात्र ते सध्या मध्यप्रदेश येथे दर्शनासाठी गेल्याचे समोर आले आहे. तर कांचन कांबळे यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदाराच्या आजोबांच्या नावावर काटेपिंपळगाव (ता. गंगापूर) येथे रास्त भाव दुकान क्र. २९ आहे. या दुकानाचे निलंबन आदेश मागे घेण्यासाठी कांचन कांबळे हिने स्वतःसाठी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासाठी एकूण ७० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने १२ जून रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर झालेल्या तडजोडीत कांबळे हिने स्वतःसाठी १५ हजार रुपये व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यासाठी २५ हजार रुपये अशी एकूण ४० हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य केले. शनिवारी दुपारी रेल्वेस्थानक परिसरात जीएसटी भवनच्या गेटजवळ लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने कांबळे हिला रंगेहाथ पकडले.
तिच्या गाडीच्या डिक्कीतून लाचेचे ४० हजार रुपये, अंगझडतीत पर्समध्ये ३ हजार रुपये, आयफोनसह दोन मोबाईलही जप्त केले. तिला न्यायालायने दोन दिवसांची कोठडी सुनावली. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर अधीक्षक मुकुंद आघाव, उप अधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक वाल्मीक कोरे, हवालदार राजेंद्र जोशी, डोंगरदिवे, सी. एन. बागुल, पुष्पा दराडे, कुंटे आदी अधिकाऱ्यांनी केली.
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसाठी प्रश्नावली तयार कांचन कांबळे हिने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचे जबाबात नाव घेतले आहे. त्यामुळे एसीबीने प्रवीण फुलारी यांच्याशी संपर्क साधला असता ट्रॅप झाल्याच्या रात्रीच शनिवारी ते मध्यप्रदेश येथे दर्शनासाठी गेल्याचे समोर आले. मात्र इकडे त्यांना चौकशीसाठी नोटीस पाठवली असून, त्यांच्यासाठी एसीबीने प्रश्नावलीही तयार करून ठेवली असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.