

वाळूज महानगर : दिल्लीत आंदोलनासाठी जाणाऱ्या सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्यासह सौरभदास आणि आशुतोष रांका या पदाधिकाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी विमानतळावर ताब्यात घेतले आहे. या कारवाईवर अभिजीतचे वडील बी. एस. दीपके व त्यांची आई अनिता दीपके यांनी तीव्र संताप व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली.
या कारवाईवर अभिजीत दीपके यांच्या आई-वडिलांनी सरकारची भूमिका लोकशाहीला काळिमा फासणारी असल्याचा आरोप करत, विद्यार्थ्यांना आंदोलनापासून रोखणे आणि त्यांना ताब्यात घेणे चुकीचे असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
या सरकारला लोकशाही मान्य नाही. मोदी आणि शहा हे गुजरात दंगलीतील दंगेखोर गुंड आहेत. विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकारला मान्य नसल्याने त्यांना प्रश्न विचारण्याची आणि आंदोलन करण्याची संधी नाकारली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान शनिवारी अभिजीत दीपके यांच्या सिडको वाळूज महानगरातील बंगल्यासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला होता. पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, विशेष शाखेचे पोलिस अधिकारी तसेच एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी याठिकाणी भेट देऊन माहिती घेतली.
अभिजीत दीपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या कारवाईवर त्यांच्या आईनेही नाराजी व्यक्त केली. माझ्या मुलाला अटक करून सरकारने चुकीचे पाऊल उचलले आहे. गंभीर गुन्ह्यांतील आरोपींवर कारवाई करण्याऐवजी विद्यार्थ्यांना आंदोलन करताना रोखले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अभिजित आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा लढा विद्यार्थ्यांच्या हितासाठी असून, त्यामुळेच त्यांना देशवासीयांचा पाठिंबा मिळत आहे.
अनिता दीपके (आई)
मुलाला ताब्यात घेतले जाईल, अशी अपेक्षा नव्हती. तो देशद्रोही किंवा दहशतवादी नाही आणि कोणत्याही गुन्ह्यात दोषी ठरलेला नाही. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला आपले म्हणणे मांडण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना आंदोलनापासून रोखून सरकार लोकशाही अधिकारांची पायमल्ली करत असून आणीबाणीनंतर देशात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होत आहे.
बी. एस. दीपके (वडील)