

A tender worth a staggering 70 lakhs has been issued for a road just 125 paces long.
राहुल जांगडे
छत्रपती संभाजीनगर : पंचतारांकित शेंद्रा एमआयडीसीत प्रशासनाकडूनच ठेकेदारांना पोसण्याचा धंदा सुरू असल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. येथील स्किल डेव्हलपेंट सेंटर अर्थात कौशल्य विकास केंद्रासमोरील अवघ्या शंभर ते सव्वाशे पावलांच्या डांबरी रस्त्यासाठी तब्बल ७० लाख रुपयांची निविदा काढण्यात आली. इतकेच नव्हे तर घाईघाईने या रस्त्याचे कामही उरकण्यात आले आहे. त्यामुळे यातून विकास नेमका कुणाचा? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
येथील शेंद्रा औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाच्या वतीने कौशल्य विकास केंद्र उभारण्यात आलेले आहे. मुख्य मार्गापासून कौशल्य विकास केंद्राकडे जाणाऱ्या या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी एमआयडीसी कडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. शंभर ते दीडशे फुटांच्या रस्त्यासाठी निविदेची अंदाजित रक्कम तब्बल ७० लाख ७७५ रुपये निश्चित केली होती. ३ जून २०२५ रोजी निविदा उघडण्यात आल्या.
यात मे. श्रीकेष इन्फास्ट्रक्चर यांची ३७.२५ टक्के कमी दराने (४३,९२,९८६रुपये) आलेली निविदा स्वीकारत एमआयडीसीच्या सक्षम अधिकाऱ्यांनी त्यांना कार्यरंभ आदेशही दिले. काम सुरू करण्याची तारीख १७ जुलै २०२५, तर काम पूर्ण करण्याची शेवटची तारीख १६ जानेवारी २०२६ होती. त्यापूर्वी महिन्याभर आधीच ठेकेदाराने या रस्त्याचे काम उरकले आहे. दरम्यान, एमआयडीसी प्रशासनाकडून या अवघ्या काही मीटर लांबीच्या रस्त्यासाठी ७० लाखांची निविदा काढली.
शासनाच्या निधीची उधळपट्टी
एमआयडीसीकडून नवीन रस्त्यांचे अंदाज-पत्रक तयार करताना नियम धाब्यावर बसवले जात असून, अवघा काही मीटरच्या रस्त्यासाठी ७० लाखांची निविदा काढणे म्हणजे शासनाच्या निधीची उधळपट्टी असल्याचा आरोप उद्यो-गजगतातून करण्यात आला आहे.
जास्तीत जास्त २० लाख होईल खर्च
नवीन एक कि.मी. रस्त्यासाठी अंदाजे सुमारे ६० ते ७५ लाख रुपयांचा खर्च येऊ शकतो. याचा दहावा भाग म्हणजे शंभर मीटरच्या नवीन रस्त्यासाठी जास्तीत जास्त १० ते २० लाख रुपये व्हायला हवा, असे तज्ज्ञांनी सांगितले. औद्योगिक क्षेत्रातील कौशल्य विकास केंद्रासमोरील रस्ता याहूनही कमी लांबीची आहे.
कसा ठरतो नवीन रस्त्याचा खर्च
नवीन डांबरी रस्ता करताना त्या रस्त्याची लांबी-रुंदी आणि जाडी यासह त्या ठिकाणीच जमीन, त्यावरील ट्रॅफिक यावर खर्च अर्वलबून असतो. काळी माती आहे का हार्ड मुरूम आहे. यावर थर बदलतात. काळी माती असेल तर दगड टाकावे लागतात. हार्ड मरूम असेल तर दगडांचा खर्च वाचतो. त्यावरचे थरही वाचतात, असेही तज्ज्ञांनी सांगितले.