

All trains are fully booked for Christmas and New Year
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
नाताळ आणि नववर्षाच्या सेलीब्रेशनसाठी अनेकांनी बाहेर जाण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे सर्वच मार्गावरील रेल्वे हाऊसफुल्ल झाल्या आहेत. विशेषतः पुणे, मुंबई, रामेश्वरम आणि तिरुपतीकडे जाणाऱ्या रेल्वेला मोठ्या प्रमाणात वेटिंग आहे. त्यातल्या त्यात धार्मिक पर्यटनकांकडेही ओढा वाढल्याने ही गर्दी वाढली असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
अनेकांनी नाताळ, नववर्षाचे स्वागत पर्यटनस्थळांना भेट देऊन साजरा करण्याचा बेत आखला आहे. तर काहींनी या दिवसांत धार्मिक पर्यटन करण्याचे नियोजन केले आहे. धार्मिक पर्यटन करणाऱ्यांनी रामेश्वरम व तिरुपतीला प्रथम पसंती दिली आहे.
त्यामुळे त्या मार्गावरील रेल्वे आगोदरच हाऊसफुल्ल झाल्या आहेत. अनेक रेल्वेच्या प्रतीक्षा यादीत मोठी वाढ झाली आहे. तात्काळ तिकिटेही काही मिनिटांत संपत असल्याने अनेकांनी दुसऱ्या मार्गाने जाण्याचे नियोजन केले आहे. या काळात अतिरिक्त डबे लावणे, विशेष रेल्वे चालवणे तसेच गर्दीच्या ठिकाणी सुरक्षेची व्यवस्था वाढवण्यात यावी, अशीही मागणी प्रवाशांकडून होत आहे.
नववर्षासाठी मुंबईला पसंती
नववर्ष साजरे करण्यासाठी अनेकांनाकडून मुंबईला पसंती जास्त देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसला २७ डिसेंबरपर्यंत, तर तपोवन, देवगिरी एक्सप्रेसलाही २७ डिसेंबरपर्यंत ५० पेक्षाही जास्त वेटिंग आहे.
देवदर्शनासाठी गर्दी
नाताळ आणि नववर्ष देवदर्शनाने करण्याचे काहींचे नियोजन आहे. त्यांनी रामेश्वरम, ओखा एक्सप्रेस, तिरुपती एक्सप्रेसची अॅडव्हान्स बुकिंग केली आहे. त्याचबरोबर नांदेड-पुणे एक्सप्रेसला मोठ्या प्रमाणात वेटिंग आहे. वेटिंग वाढल्याने अनेकांनी बाय रोड वाहनांनी जाण्याचे नियोजन केले असल्याची माहिती पर्यटकांनी दिली.