

A team of taluka agricultural officers searched the agricultural service center in the area
बबन गायकवाड
वाळूज :
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे क्या हुआ तेरा वादा, या अभियानांतर्गत रविवारी (दि.८) शेंदुरवादा भागात आले असता सावखेडासह शेंदुरवादा भागातील शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन दानवे थेट दहेगाव बंगला येथील कृषी बियाणे दुकानवर धडकले.
संबंधित दुकानदाराला जाब विचारत कृषी अधिकाऱ्यांनाही चांगलेच धारेवर धरले. दानवे यांनी कान टोचताच कृषी विभागाची चांगलीच पळापळ झाली. विशेष म्हणजे रविवारी रात्रीच तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या पथकाकडून परिसरातील कृषी सेवा केंद्राची झाडाझडती घेण्यात आली.
शिवसेना ठाकरे गटाकडून प्रत्येक गावात सरकारला जाब विचारण्यासाठी क्या हुआ तेरा वादा हे अभियान राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अंबादास दानवे हे रविवारी शेंदुरबादा भागात आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर व्यथा मांडताना शासनाने दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचे सागितले. तसेच दहेगाव बंगला येथील कृषी सेवा केंद्र चालकाकडून शेतकऱ्यांना पाहिजे असलेले कापूस बियाणांचे वाण न देणे, अधिकचे पैसे घेणे, घेतलेल्या मालांच्या पावत्या न देणे, नको असलेली खते माथी मारणे असे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी केल्या.
कार्यक्रम आटोपल्यानंतर दानवे यांनी कार्यकत्र्यांसह दहेगाव बंगला येथील किसान एजन्सीज कृषी सेवा केंद्र गाठून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत विचारणा करत दुकानदारसह अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत राज्याचे कृषी विभागाच्या सचिवांना याची माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास सांगितले.
कृषी अधिकाऱ्यांचे वरातीमागून घोडे विरोधी पक्षनेते दानवे यांनी कृषी केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची कशी अडवणूक केली जात आहे, याविषयी राज्याचे कृषी विभागाच्या सचिवांना माहिती दिली. त्यानंतर सचिवांनी थेट जिल्हा प्रशासनाला माहिती देत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या सूचना केल्या.
सदरची कुणकुण लागताच तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या पथकाने रविवारीच उशिरा संबंधित किसान एजन्सीसह इतर कृषी सेवा केंद्राची दुकाने गाठून चौकशी करत त्यांची झाडाझडती केल्याची चर्चा आहे. दरम्यान, जि. प. कृषी अधिकारी प्रकाश पाटील, मोहिम अधिकारी पंकज ताजणे, तालुका कृषी अधिकारी बापूराव जायभाय, पं.सं.कृ.अ. अजय गवळी, जिल्हा गुणवत्ता निरीक्षक हरिभाऊ कातोरे यांच्या पथकाने सोमवारी (दि.९) पुन्हा सदर दुकानाची तपासणी करून पंचनामा केला. मात्र तपासणी अजून सुरूच असल्याच्या नावाखाली त्यांनी माहिती देण्याची टाळाटाळ करून तपासणी पूर्ण झाल्यानंतर माहिती दिली जाईल, असे पथकाने मपुढारीफ्शी बोलताना सांगितले.
वाळूज भागातही असेच प्रकार सुरू शेतकऱ्यांना लुटण्याचा असाच घाणेरडा प्रकार बाळूजसह परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. संबंधित दुकानदार आणि कृषी विभागातील काहीचे लागेबांधे असल्याने कारवाई शून्य असल्याची चर्चा यावेळी ऐकायला मिळाली. मात्र तालुका कृषी पथकाकडून कृषी सेवा केंद्र दुकानाची झडती घेण्यात येत असल्याने वाळूजसह परिसरातील दुकानदारांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.