

A notorious criminal gang fatally attacked a police officer
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा पोलिसांचे वाहन अडवून कुख्यात गुन्हेगारांच्या टोळीने पोलिस अंमलदारावर जीवघेणा हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि.१५) रात्री पावणेबाराच्या सुमारास सूतगिरणी चौक भागात घडली. कुख्यात पवन जैस्वाल आणि त्याचे तीन साथीदार अशी आरोपींची नावे असून, सर्व फरार असल्याची माहिती एपीआय शिवप्रसाद कऱ्हाळे यांनी गुरुवारी (दि.१७) दिली.
पोलिस अंमलदार फिर्यादी राहुल नरेश चावरिया (३८, रा. गांधीनगर) हे मोटार वाहन विभागात चालक म्हणून कार्यरत आहेत. व्हीआयपी दौरे, वरिष्ठ अधिकाऱ्यांना ने-आण करण्याचे काम करतात. सोमवारी (दि.१४) त्यांना सीआयडी कार्यालयातून फोन आला. त्यात पोलिस निरीक्षक भालेराव मॅडम यांना बीड येथे तपासासाठी मंगळवारी सकाळी घेऊन जायचे असल्याचा निरोप देण्यात आला.
त्याप्रमाणे ते मंगळवारी बीड येथे जाऊन रात्री परत आले. पावणेबाराच्या सुमारास सीआयडी ऑफिसला पोहोचले. तेथून पीआय भालेराव यांना घरी सोडण्यासाठी वाहनाचा अंबरदिवा लावून ते स्नेहनगर येथून निघाले. दर्गा चौकमार्गे जात असताना विभागीय क्रीडा संकुलाजवळ त्यांच्या वाहनासमोर दोन दुचाकीवर चौघे जण हॉर्न वाजवीत झिकझंक पद्धतीने समोर जात होते. चावरिया यांच्या पोलिस वाहनाला आरोपी पुढे जाण्यासाठी रस्ता देत नव्हते. सूतगिरणी चौकाजवळ चावरिया यांनी त्यांच्या पुढे पोलिस वाहन नेले. तेव्हा चौघेही शिवीगाळ करून थांवण्याचा इशारा करू लागले. चावरिया यांनी वाहन थांबविले. तेव्हा दुचाकीवरून (एमएच-२०-एफडी-७६०५) पवन जैस्वाल उतरला. त्याने पोलिस वाहनाचा दरवाजा ओढून शिवीगाळ केली.
सीआयडीच्या पोलिस निरीक्षक श्रीमती भालेराव या पोलिस वाहनात असताना कुख्यात गुन्हेगार पवन जैस्वाल याने पोलिस अंमलदार राहुल चावरिया यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला.
या गुन्हेगारांची मुजोरी एवढी वाढली आहे की, पोलिसांचे वाहन अडवून थेट हल्ला करण्यापर्यंत मजल गेली आहे. त्यामुळे पोलिसच सुरक्षित नसल्याने सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हल्ला होताच चावरिया यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सुरू केली. तेव्हा पवन जैस्वालने फायटरने पोलिस अंमलदार चावरिया यांच्या डोळ्याच्या खाली मारून जखमी केले. अन्य तिघांनी लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्याच्या पाठीमागे फायटरने प्रहार केल्याने चावरिया वेशुद्ध झाले. शुद्धीवर आले तेव्हा ते आयसीयूमध्ये होते. पीआय भालेराव यांनी त्यांना आनंदी हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. तेथून सिग्मामध्ये हलविण्यात आले आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास एपीआय कन्हाळे करत आहेत.
पोलिसांच्या वाहनावर हल्ला करून अंमलदारला ठार मारण्याचा प्रयत्न करणारा पवन जैस्वाल हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वीच तो एमपीडीएमध्ये हसूल जेलमधून सुटून बाहेर आला आहे. पोलिसावर हल्ला केल्यानंतर तो साथीदारांसह फरार झाला आहे.