

A municipal clerk was caught red-handed while accepting a bribe
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या मालमत्ता कर विभागात कार्यरत एका लिपिकाने ३ लाख रुपयांचा वाढीव व्यावसायिक कर कमी करून देण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करत १० हजार स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.२३) स्मार्ट सिटी कार्यलयात करण्यात आली. रवींद्र दशरथ आदमाने (४१, रा. रेणुकानगर, गारखेडा) असे आरोपीचे नाव आहे.
तक्रारदाराचे गुलमंडी परिसरातील सुपारी हनुमान मंदिर रोडवर पूजेच्या साहित्याचे दुकान आहे. या दुकानाचा नियमित कर भरत असतानाही त्यांना महापालिकेकडून वाढीव कराची नोटीस बजावण्यात आली होती. या प्रकरणाचा पाठपुरावा करताना लिपिक आदमाने याने दुकानाची मोजणी केली आणि तक्रारदाराला मागील ७ वर्षांचा ३ लाख रुपये व्यावसायिक कर भरावा लागेल, अशी भीती घातली.
हा मोठा कर थेट २० हजार रुपयांपर्यंत कमी करून देण्याचे आमिष आदमाने याने तक्रारदाराला दाखवले. यासाठी त्याने स्वतःसाठी ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने तक्रार केली. रवींद्र आदमाने डिसेंबर रोजी एसीबीकडे धाव २३ पंचांसमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीत ३० हजार रुपयांच्या मागणीत तडजोड होऊन २६ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यापैकी पहिल्या हप्त्यातील १३ हजार रुपये मंगळवारी द्यायचे निश्चित झाले. तक्रारदाराकडून १० हजार रुपये आदमाने याने स्वीकारताच पथकाने त्याला ताब्यात घेतले.
रात्री उशिरापर्यंत बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधीक्षक माधुरी कांगणे, अपर अधीक्षक शशिकांत सिंगारे, उपअधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक बाळासाहेब शिंदे, निरीक्षक योगेश शिंदे, जिवडे, जोशी आणि डोंगरदिवे यांच्या पथकाने केली.