

A gang of local thugs caused a disturbance in Connaught
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील गजबजलेल्या सिडको भागातील कॅनॉट परिसरात चहाच्या हॉटेलसमोर धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटांत जबर राडा झाला. कुख्यात गुन्हेगारांच्या ८ ते १० जणांच्या टोळीने चाकू, दांड्याने दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले. तर दुसऱ्या गटातील तरुणांनीही चाकूहल्ला केल्याने एक जण जखमी झाला आहे. सिडको पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी खुनाचा प्रयत्न आणि दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना रविवारी (दि. २५) रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.
फिर्यादी पवन दिगंबर गिते (२०, रा. मुकुंदवाडी) याच्या तक्रारीनुसार, त्याचा नातेवाईक शैलेश घुगे आणि कुख्यात गुन्हेगार विशाल खेत्रे, उत्कर्ष सोपारकर, गौरव वानखेडे यांच्यात गवारे चहा दुकानासमोर वाद सुरू होता. आरोपी घुगेसह त्याच्या मित्रांना आरोपी दांड्याने मारहाण करत असल्याने पवन भांडण सोडवण्यासाठी गेला असता आरोपींचे टोळके चाकू, दांडे घेऊन पवनच्या अंगावर धावले. त्यांना घाबरून तो पळत सुटला.
तेव्हा विशाल खेत्रे, गौरव वानखेडे याच्या टोळीने पवनवर चाकूने प्राणघातक वार केले. तोंडावर, पायावर दांड्याने मारहाण केल्याने तो खाली पडला. पवन जिवाच्या आकांताने ओरडत होता, तरीही आर ोपी त्याला ठार मारण्याच्या उद्देशाने अमानुषपणे मारहाण करत होते. तिथे लोकांची गर्दी जमा झाली. त्यानंतर पवनला जखमी अवस्थेत त्याचा भाऊ राधेश्याम आणि ओंकार आघाव यांनी घाटीत दाखल केले.
तर दुसरीकडे, विशाल येशू खेत्रे (२४, रा. अयोध्यानगर) याने तक्रार दिली असून, त्यानुसार, धक्का लागल्याच्या कारणावरून आरोपी शैलेश घुगे, पवन गिते आणि त्यांच्या इतर ३-४ जणांनी त्याला शिवीगाळ करत मारहाण केली. पवनने मानेवर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला, जो चुकवताना त्याच्या दंडाला इजा झाली आणि शैलेशनेही चाकूने कपाळावर व छातीवर वार केल्याने गंभीर जखमी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या दोन्ही घटनांमध्ये जखमी झालेल्या तरुणांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकरणाचा अधिक तपास सिडको ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक योगेश गायकवाड करत आहेत.
चार आरोपींना पोलिस कोठडी
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अतुल येरमे, सहायक निरीक्षक योगेश गायकवाड, उपनिरीक्षक अनिल नाणेकर, सोपान नरळे, हवालदार दीपक देशमुख, विशाल सोनवणे, संदीप जाधव, अमोल अंभोरे, देवा साबळे, प्रकाश फरकाडे यांच्या पथकाने धाव घेतली. जखमींना रुग्णालयात नेले. तर पसार झालेल्यांपैकी गौरव नानासाहेब वानखेडे (२४), रोहन भगवान जाधव (२७, दोघेही रा. त्रिवेणीनगर, एन-७) आणि दामोदर बालाजी आघाव (१९) आणि राधेश्याम दिगंबर गीते (२२, दोघेही रा. जयभवानीनगर) यांना अटक केली. चौघांना २९ जा-नेवारीपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
आताच जेलमधून आलोय, गेमच करतो
विशाल खेत्रेने मी आताच जेलमधून बाहेर आलोय, याचा गेमच करून टाकतो, पुन्हा काही दिवस आत जाऊन येतो, यालाच पकडा, असे म्हणत चाकू उपसला. पवन गीते हा जीवाच्या आकांताने धावत असताना आरोपींनी त्याला गाठले आणि पाठीवर चाकूने सपासप वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. गौरव वानखेडे यानेही मी मोठा गुन्हेगार आहे, असे म्हणत पवनच्या कपाळावर आणि खांद्यावर जीवघेणे वार करून रक्तबंबाळ केले. पवन मृत झाल्याचे समजून कुख्यात गुन्हेगार विशाल खेत्रे, गौरव वानखेडे यांची टोळी तेथून पसार झाली.
टोळीचा दहशत माजवण्याचा प्रयत्न
हल्ला करणारे गौरव वानखेडे आणि विशाल खेत्रे, रोहन जाधव हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी आहेत. त्यांच्यावर यापूर्वीही खुनाच्या प्रयत्नाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे शस्त्रे उपसून दहशत माजवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कॅनॉट भागात स्टंटबाज, राडेबाजांच्या टोळ्या सर्रासपणे घुमाकूळ घालत असल्याने पोलिसांनी त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.