

A friend on Instagram seduced a 10th grade girl and abducted her.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणाने एक महिला आणि मित्राच्या मदतीने दहावीत शिकणाऱ्या मुलीचे कारमधून फूस लावून अपहरण केले. नगर येथे हॉटेलात जेवण करताना मुलगी ओरडल्याने तिन्ही आरोपींनी तिला रात्री परत आणून सोडले. हा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.४) दुपारी चार ते रात्री बारा वाजेदरम्यान नारेगावात घडला.
शहानुर जहूर शेख (२०, रा. मोतीकारंजा), शहानुरचा मामे भाऊ साहिल आणि त्याची पत्नी सालेहा अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी ३५ वर्षीय महिलेची १५ वर्षीय मुलगी (सुहाना नाव बदललेले) ही इयत्ता दहावीत शिकते. तिला आईने नातेवाइकांना कार्यक्रमात गिफ्ट देण्याचे असल्याने मोबाईल घेऊन दुकानावर पाठविले. दुपारी चारच्या सुमारास गेलेली सुहाना बराच वेळ झाला तरी परत आली नसल्याने आईने सर्वत्र शोध सुरू केला.
मोबाईलवर संपर्क केला असता रिंग गेली, पण तिने उचलला नाही. त्यानंतर रात्री ८ वाजता मोबाईल बंद झाला. त्यामुळे कुटुंबीय आणि नातेवाइकांनी रात्री पावणेअकराच्या सुमारास एमआयडीसी सिडको पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. तेवढ्यात सुहानाच्या भावांनी नगरनाका येथे दोन तरुणांसह एका महिलेला पकडून घरी आणले असे कळविले. घरी गेल्यानंतर सुहानाला पाहून आईने तिच्याकडे विचारणा केली.
तेव्हा तिने सांगितले की, शहानुरसोबत इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. त्याने फोन करून दुकानाजवळ बोलावले होते. तेथून त्याने चल आपल्याला सामान आणायचे आहे, असे म्हणून कारमध्ये (एमएच-२०-एचबी-७८६७) बसविले. त्यात बुरखाधारी सालेहा आणि साहिल बसलेले होते. तिघांनी सुहानाला खुलताबाद व तेथून अहिल्यानगर येथे हॉटेल कुरेशीवर घेऊन गेले. तिचा मोबाईल आरोपींनी बंद केला होता. हॉटेलमध्ये सुहानाला जेऊ घातले. मात्र तिथे ती जोरजोरात ओरडल्याने आरोपीने घाबरून तिला पुन्हा शहरात घेऊन आले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.