

Schoolgirls in the city are unsafe Student molested by rickshaw driver
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, मुकुंदवाडी भागात स्कूलबस चालकाने ९ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना ताजी असतानाच ३० जुलै रोजी टीव्हीसेंटर भागात दररोज शाळेत ने-आण करणाऱ्या रिक्षाचालकाने थेट मुलीच्या छातीवर हात टाकल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्याच काळात सलग दोन घटना घडल्याने मुलींनी शाळेत जायचे कसे? त्यांच्या सुरक्षेबाबत पोलिस आणि शालेय प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
संतोष ठाकरे (रा. एन-१३, हडको) असे आरोपी रिक्षाचालकाचे नाव असून, सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहितीनुसार, फिर्यादी ४० वर्षीय महिलेची १३ वर्षीय (साक्षी नाव बदललेले) ही इयत्ता आठवीत शिकते. तिच्या शाळेची वेळ सकाळी साडेआठ ते दुपारी दोन अशी आहे. शाळेत जाण्या-येण्यासाठी संतोष ठाकरे याची रिक्षा लावलेली आहे. त्या रिक्षात साक्षीच्या घराजवळील अन्य विद्यार्थीही आहेत. गेल्या एक महिन्यापासून शाळा सुटल्यानंतर स्पोर्ट आणि एक्स्ट्रा क्लास अधून-मधून होत होते. त्यामुळे साक्षीचे आई-वडील तिला तेव्हा शाळेतून घरी घेऊन येत होते. १५ दिवसांपूर्वी रिक्षाचालक संतोष ठाकरे याने साक्षीच्या वडिलांना फोन केला. साक्षीचा स्पोर्ट क्लास झाल्यानंतर तिला घरी घेऊन येऊ का, अशी विचारणा केली.
त्याला तिच्या वडिलांनी होकार दिला. ३० जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास साक्षी शाळेतून घरी आली. ती घाबरलेली दिसल्याने आईने तिची विचारपूस केली. तिने सांगितले की, शाळेतून घरी येत असताना रिक्षावाले संतोष काकाने तिला एम-२ रोडवर अचानक रिक्षा थांबविली. रिक्षातून खाली उतरून मागच्या बाजूला येऊन तिच्च्या छातीला हात लावू लागला. साक्षीने पप्पांना सांगेल, असे काही करू नका, असे बोलताच संतोष घाबरला. त्याने साक्षीला घरी सोडून दिले. त्यानंतर साक्षीच्या पालकांनी ३१ जुलै रोजी सिडको पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्याने गुन्हा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी रिक्षाचालक संतोषला घरातून अटक केली. रिक्षा जप्त करण्यात आली. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. आरोपी रिक्षाचालक संतोष ठाकरे हा विवाहित असून, त्याला दोन मुली आहेत. असे असताना त्याने १३ वर्षीय साक्षीच्या अंगावर वाईट हेतून हात टाकून माणुसकीला काळीमा फासली आहे.
शहरात स्कूलबस, रिक्षामधून प्रवास करणाऱ्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न या दोन घटनांवरून चिंतेचा विषय बनला आहे. शालेय प्रशासनाकडून स्कूलबस, रिक्षाचालकांचे पोलिस व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे. त्यांची नियमित तपासणी, विद्यार्थ्यांशी नियमित संवाद साधून सुरक्षेसंबंधी सतर्क राहिले पाहिजे. मात्र या दोन घटनांमुळे मुलींच्या सुरक्षेकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. पोलिस, आरटीओ यांची तपासणी मोहीम सुरू असतानाच या दोन घटना घडल्याने प्रशासनाच्या मोहिमेचा बुरखा फाटला आहे.
आपल्या मुलीला शाळेत पाठवताना सुरक्षिततेचा पूर्ण विश्वास असावा, अशी प्रत्येक पालकाची अपेक्षा असते. मात्र स्कूलबस आणि रिक्षाचालकांकडून होत असलेल्या विनयभंगाच्या घटना उघडकीस आल्यामुळे पालकांच्या मनात प्रचंड असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. आपल्या चिमुकल्या मुलीला शाळेत पाठवायचे तरी कसे, असा प्रश्न अनेक पालकांना सतावत आहे. त्यातच ३१ जुलै रोजी दाखल झालेला सिडकोचा गुन्हा आणि त्याच काळात मुकुंदवाडी येथील एक गुन्हा पोलिसांनी माध्यमांपासून लपविला. विकृत, नराधम लोकांची नावे जगासमोर आली तरच पुन्हा कोणी अशी हिम्मत करणार नाही. मात्र हीच नावे पोलिसांकडून का लपविली जात आहेत, हाही गंभीर प्रश्न आहे.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एका इंग्लिश माध्यमाच्या शाळेतील चौथीत शिकणाऱ्या ९ वर्षीय विद्यार्थिनीचा स्कूलबस पोलिस आयुक्त चालकाने तर सिडकोत प्रवीण पवार रिक्षाचालकाने १३ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. शाळा प्रशासनाला शासनाने घालून दिलेले सुरक्षेचे मापदंड वारंवार सांगूनही पाळले जात नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले. त्यामुळे यापुढे जर सुरक्षेसंबंधी हलगर्जीपणा झाला तर शालेय प्रशासनातील जबाबदार व्यक्तीवर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी बुधवारी (दि.६) दिला आहे.
शहर हद्दीत मोठ्याप्रमाणात विविध माध्यमांच्या शाळा आहेत. या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी शाळांतर्फे स्कूलबस, व्हॅन, रिक्षांची व्यवस्था करण्यात येते. मात्र शाळांकडून स्कूलबस संबंधी नियमांचे गांभीयनि पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत बोलताना पोलिस आयुक्त म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच बैठक घेऊन वाहतूक शाखा, आरटीओ यांना कारवाईच्या सूचना केल्या आहेत. तपासणी मोहीम सुरूच आहे. स्कूलबस चालकाने चौथीतील मुलीचा हात पकडून अश्लील भाषेत तिचा विनयभंग केला. याची गंभीर दखल घेऊन सखोल तपास करत आहोत. त्यात मोठी कारवाई केली जाईल. अंबरनाथ येथे घडलेल्या घटनेनंतर सर्व शाळांना पोलिसांनी भेटी दिल्या. शासनाच्या नियमावली सांगून सर्व कर्मचाऱ्यांचे पोलिस व्हेरिफिकेशन करून घेण्यास सांगण्यात आले. मात्र तरीही नियम पाळले जात नाहीत. पोलिसांनी तरी किती वेळा शाळांना सांगावे, असा उद्विग्न सवाल पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी केला. यापुढे जर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंबंधी मापदंड पाळले गेले नाहीत तर शाळा प्रशासनावर कारवाई करणार, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी कारवाईचे आदेश देताच गेल्या सात महिन्यांत नियम न पाळणाऱ्या स्कूलबस, व्हॅनविरुद्ध पोलिसांनी मोहीम हाती घेतली. गेल्या सात महिन्यांत तब्बल ५६८ स्कूलबस, व्हॅन, रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत ४ लाख ८१ हजार १०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. त्यामुळे बेशिस्तपणे स्कूलबस चालकांकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे भीषण चित्र समोर आले आहे.
स्कूलबस चालकाकडे वैध 2 परवाना, पोलिस व्हेरिफिकेशन व वैद्यकीय प्रमाणपत्र बंधनकारक, बस फिटनेस व आरटीओ तपासणी अनिवार्य. विद्यार्थ्यांशी नम्र, आदरयुक्त वर्तन. शारीरिक संपर्क व आक्षेपार्ह भाषा टाळावी. जीपीएस, सीसीटीव्ही अनिवार्य, महिला कर्मचारी किवा प्रतिनिधी बसमध्ये असावा. आठवड्याला सीसीटीव्ही फुटेज तपासणी करावी. दर ६ महिन्यांनी चालकांचे पुनर्मूल्यांकन, पोक्सो, मोटर वाहन व बालहक्क कायद्यांचे पालन करावे. शाळांनी खासगी एजन्सींसोबत करार करताना ही नियमावली लागू करावी. मात्र, काही शालेय प्रशासन काटेकोरपणे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे.