

Hard disk in strong room full
कन्नड पुढारी वृत्तसेवा :
नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होऊन नऊ दिवस उलटून गेले असताना मतपेट्या स्ट्रॉगरूममध्ये सुरक्षिततेत ठेवण्यात आल्या आहेत. या सुरक्षिततेसाठी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या हार्डडिस्कमध्ये गेल्या नऊ दिवसांचा सततचा रेकॉर्डिंग डेटा साठल्याने ती पूर्ण क्षमतेने भरली. त्यामुळे रेकॉर्डिंग अखंड सुरू ठेवण्यासाठी पर्यायी हार्डडिस्क बसविण्याची गरज निर्माण झाली होती.
निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ बंगाळे, मुख्याधिकारी रवींद्र लांडे, प्रभारी तहसीलदार दिलीपकुमार सोनवणे, तसेच सीआरपीएफचे सहायक पोलीस निरीक्षक एच. आर. शेंडे यांच्या उपस्थितीत आणि विविध पक्षांच्या उमेदवार व प्रतिनिधींच्या समक्ष हार्डडिस्क बदलण्याची महत्त्वपूर्ण प्रक्रिया पार पडली.
यावेळी १ टीबी क्षमतेची नवीन हार्ड डिस्क सीसीटीव्ही सिस्टमला जोडण्यात आली. पूर्वीची हार्डडिस्क सर्वांच्या उपस्थितीत सिस्टममधून काढून तहसील ट्रेझरी रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात येणार आहे.
मतमोजणीपूर्वी कोणतीही शंका राहू नये आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक राहावी यासाठी हा उपाय योजल्याचे तसेच पंधरा पोलिसांचा खडा पहारा असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ बंगाळे यांनी स्पष्ट केले. सीसीटीव्ही रेकॉर्डिंगचे सातत्य राखत मतपेट्यांवरील सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न निवडणूक विभागाकडून करण्यात येत आहे.
या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान उमेदवार प्रतिनिधी योगेश कोल्हे, माजी नगर-सेवक संतोष निकम, दीपक ताठे, असद पवार, रवींद्र राठोड, कार्यालय अधीक्षक प्रशांत देशपांडे यांची उपस्थिती होती.