पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या बिडकीन येथील ग्रामपंचायतमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेतून मिळालेला निधी ६८ लाख २८ हजार ५५० रुपयाचा अपहार केला आहे. याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख मनोज पेरे यांच्या तत्कालीन सरपंच पत्नी सारिका मनोज पेरे व ग्रामविकास अधिकारी एन.डी. पाडळे यांच्याविरुद्ध दि.११ रोजी बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बिडकीन ग्रामपंचायत अंतर्गत राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनेअंतर्गत दि. ५ मे २०२१ ते १५ मे २०२१ या कालावधीत मिळालेल्या निधीतून रोजगार हमी योजनेअंतर्गत सोमपुरी ते मदरसा या रस्त्याच्या कामावर १ लाख २३ हजार व १४ वित्त आयोगातून पेव्हर ब्लॉक, सिमेंट रस्ता, ड्रेनेज लाईन आवास योजना लाभार्थी अहमदखा अब्बासखॉ पठाण यांना लाभ देण्याचे दाखविण्यात आले. मात्र, ऑनलाईन नोंदणी दुसऱ्या लाभार्थ्याच्या नाव दाखविण्यात आले आहे. या अंतर्गत तत्कालीन सरपंच सारीका मनोज पेरे व ग्रामविकास अधिकारी एन. डी. पाडळे यांनी संगणमत करून ६८ लाख २८ हजार ५५० रुपयाचा अपहार केल्याचे चौकशीतून निष्पन्न झाले.
यासह जिल्हा विकास निधी अंतर्गत बांधकाम करण्यात आलेले दुकान गाळे मर्जीप्रमाणे वाटप करून साहित्य खरेदी इ.चे निविदा प्रणालीचा वापर न करणे व एकाच दिवशी साहित्य पुरवठा दाराच्या नावाने वेगवेगळ्या धनादेश देण्यात आले. या संदर्भात जिल्हा परिषद मुख्य अधिकारी यांची कुठलीही परवानगी न घेतल्याने या प्रकरणाची सखोल चौकाशी करण्यात आल्याने संबंधित तात्कालीन सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी अपहार करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
सोमवारी रोजी बिडकीन पोलीस ठाण्यात पंचायत समिती विस्तार अधिकारी देविदास तोताराम गवळी ( रा. छत्रपती संभाजीनगर ) यांनी फिर्याद दाखल केल्यामुळे तात्कालीन सरपंच सारिका मनोज पेरे व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी बिडकीन एन.डी. पाडळे यांच्याविरुद्ध अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश सुरासे, जमादार दंडगव्हाळ हे करीत आहे.
हेही वाचा :