

A bribe of 5 crore was demanded for the approval of a training center
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी २५ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्याच्या मोबदल्यात सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी पाच कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला. बुधवारी (दि. २५) छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. यावेळी या प्रकरणातील तक्रारदार नरसिंग उदगीरकर उपस्थित होते. शिरसाट यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची २७ प्रकरणे आपल्याकडे असल्याचा दावा करत राऊत यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
उदगीरकर यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी २५ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तताही केली होती. मात्र, प्रस्ताव मंजुरीसाठी संबंधित मंत्र्यांनी त्यांना रात्री निवासस्थानी बोलावले. तेथे भंडारी नावाच्या ओएसडीमार्फत प्रस्ताव मंजूर करण्यासाठी २० टक्के रकमेची मागणी करण्यात आल्याचे उदगीरकर यांनी सांगितल्याचा दावा राऊत यांनी केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात गेल्यानंतरही उदगीरकर यांच्यावर पैशांसाठी दबाव टाकण्यात आल्याचे राऊत म्हणाले.
एसीबीवरही उपस्थित केले प्रश्न
उदगीरकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त संचालक विश्वास नांगरे-पाटील यांची भेट घेऊन मंत्र्यांकडून पैशांची मागणी होत असल्याची माहिती दिली होती. मात्र, या विभागातूनच मंत्र्यांना या प्रकरणाची माहिती दिली गेल्याची शंका राऊत यांनी व्यक्त केली. याची गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. गरिबांच्या कामांसाठी मंत्री पैसे मागत असतील, तर हे राज्याचे दुर्दैव असल्याचे ते म्हणाले.
मला १० कोटींच्या वरचा प्रस्ताव मंजूर करण्याचा अधिकारच नाही : शिरसाट
छत्रपती संभाजीनगर: उदगीर येथे अण्णा भाऊ साठे ट्रेनिंग सेंटरच्या २५ कोटींच्या प्रस्तावासाठी पाच कोटींची लाच मागितल्याचा खासदार संजय राऊत यांनी केलेला आरोप सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी फेटाळून लावला आहे. मंत्री म्हणून मला १० कोटींच्या वरचा प्रस्ताव मंजूर करण्याचा अधिकारच नाही, असे सांगत 'मातोश्रीचा मागचा दरवाजा कशासाठी होता आणि टेम्पो आत कसे यायचे ?'
असा प्रतिसवाल केला आहे. ते म्हणाले की, मला मंत्री होऊन दोन वर्षे झाली आहेत. या दोन वर्षांत मी २५ कोटींचा एक तरी प्रस्ताव मंजूर केल्याचे पुराव्यासह दाखवून द्या. मला मंत्री म्हणून १० कोर्टीच्या वरचा प्रस्ताव मंजूर करण्याचा अधिकारच नाही, ती फाईल थेट मुख्यमंत्र्यांकडे जाते आणि त्यांच्या सहीची गरज असते. उदगीरकर नावाच्या गृहस्थाने २५ कोटींचा प्रस्ताव दिला होता, पण काम झाले नाही म्हणून लेटरहेडवर महापुरुषांचे नाव लावून बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तर मी कुठच्या कुठे लटकवून टाकेन," असा इशारा शिरसाट यांनी दिला.