

77th Republic Day celebrations of the country Guardian Minister Sanjay Shirsat
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: लोकशाही, आपले प्रजासत्ताक बळकट करण्यासाठी सारे मिळून प्रयत्न करू, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले. देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन समारंभाचा जिल्ह्याचा मुख्य शासकीय सोहळा पोलिस आयुक्तालयाच्या देवगिरी या मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या शानदार संचालनाने उपस्थितांच्या मनात देशभक्तीची भावना वृद्धिंगत केली.
याप्रसंगी विधानपरिषदेचे सदस्य आ. संजय केणेकर, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे तसेच विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, छत्रपत्री संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे तसेच सर्व विभागप्रमुख, स्वातंत्र्य सैनिक, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.
पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत होऊन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. राज्यगीतही सादर झाले. पालकमंत्र्यांनी परेड निरीक्षण करून उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
आपल्या भाषणात पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, आपल्या देशात प्रजासत्ताक लोकशाहीचा अंगिकार आजच्या दिवशी झाला. विविधतेने नटलेला आपला हा देश एकतेच्या सूत्रात गुंफणाऱ्या संविधानाची महती घरोघरी पोहोचवू या. आपली लोकशाही, आपले प्रजासत्ताक बळकट करण्यासाठी सारे मिळून प्रयत्न करू, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, नागरिकांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रविणा कन्नडकर यांनी सूत्रसंचालन केले.