

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील भावसिंगपुरा येथे सुनील गौतम जाधव (२५, रा. सादातनगर) या तरूणाचा मृतदेह आढळला हाेता. त्याच्या खुनाचा छावणी पोलिसांनी २४ तासांच्या आत उलगडा केला आहे. दारू पिताना वाद झाल्याने चार मित्रांनीच त्याचा दगडाने ठेचून खून केल्याचे तपासात उघड झाले. त्यानुसार आज (दि.१६) छावणी पोलिसांनी चौघांना अटक केली. आकाश प्रकाश बनसोडे (२६), आकाश ईश्वर साठे (१९), नीलेश महेंद्र जाधव (१९) आणि चंद्रकांत शशिकांत साळवे (सर्व रा. निसर्ग कॉलनी, भावसिंगपुरा), अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.
अधिक माहितीनुसार, लालमाती, भावसिंगपुरा भागात सोमवारी (दि.१५) एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. दोन ते तीन दिवसांपूर्वीचा हा मृतदेह असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली होती. अधिक तपासानंतर हा मृतदेह तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सुनील जाधवचा असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात पोलिसांनी त्याचा भाऊ अनिल जाधवच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर माहिती घेतली असता १३ एप्रिलला मित्राला भेटण्यासाठी म्हणून सुनील हा घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो घरी परतला नाही, असे समोर आले.
सुनीलच्या मोबाइलवरून आकाश बनसोडे याचे सर्वाधिक कॉल आल्याचे पोलीस तपासादरम्यान पुढे आले. पोलिस निरीक्षक होळकर, उपनिरीक्षक सोपान नरळे, हवालदार नूर सय्यद अहमद, सिद्धार्थ थोरात, नारायण पायघन, साईनाथ अगिवले, रवींद्र देशमुख, सुमेध पवार, मंगेश शिंदे, योगेश राऊत, कैलास सोरमारे यांच्या पथकाने आकाश बनसोडे याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करताच त्याने खूनाची कबुली दिली. तो म्हणाला, १३ एप्रिलला सुनील जाधवला रेल्वे स्टेशनहून दुचाकीने लालमाती परिसरात आणले. तेथे आकाश साठे, नीलेश जाधव आणि चंद्रकांत साळवे हेदेखील आले. पाचही जण दारू प्यायला बसले. दारू पिताना वाद झाल्यावर आकाश बनसोडे, आकाश साठे, नीलेश जाधव आणि चंद्रकांत साळवे या चौघांनी मिळून सुनील जाधवचा खून केला. त्यानंतर चौघांनीही तेथून पळ काढला.
हेही वाचा :