छत्रपती संभाजीनगर : हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या भिन्न धर्मीय तरूण-तरूणीला बेदम मारहाण | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या भिन्न धर्मीय तरूण-तरूणीला बेदम मारहाण

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दोघे भिन्न धर्मीय तरुण-तरुणी हॉटेलमध्ये जेवायला आल्याचे समजताच जमावाने त्यांना बेदम मारहाण केली. या प्रकरामुळे कटकट गेट परिसरातील हॉटेल शालिमार येथे तुफान राडा झाला. त्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. मंगळवारी (दि.२७) रात्री अकरा वाजता ही घटना घडली.

कटकट परिसरामध्ये शालीमार नावाचे हॉटेल आहे. मंगळवारी रात्री भिन्न धर्मीय तरुण-तरुणी आल्याने तेथील ग्राहकांना आणि काम करणाऱ्या मुलांना पाहवले नाही. त्यांनी कोणत्या ना कोणत्या कारणाने त्या तरूणासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर जमाव जमला आणि त्यांनी तरुणाला बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती हॉटेल मालकाने पोलिसांना कळवली. त्यावर जीन्सी ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. हॉटेल तातडीने बंद करण्यात आले. पोलिसांचा मोठा फौजफाटा आल्याने कटकट गेट परिसरात छावणीचे स्वरूप निर्माण झाले होते. बराच काळ कटकटगेट परिसरात तणावाची परिस्थिती होती.

घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस उपायुक्त नवनीत कांवत, नितीन बगाटे, अपर्णा गीते, शीलवंत नांदेडकर यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत करून तरुण-तरुणीची सुटका केली. त्यांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले. दरम्यान हा प्रकार खासदार इम्तियाज जलील यांना समजला. ते देखील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते. उशिरापर्यंत या भागात जमाव टोळक्याने दिसत होता.

हेही वाचा : 

Back to top button