

लातूर; पुढारी वृतसेवा : लातूरमध्ये तीन शालेय विद्यार्थ्यांनी मोबाईल विकत घेण्यासाठी चक्क एका महिलेच्या गळ्यातील गंठण लंपास केल्याची घटना घडली. पोलिसांनी केलेल्या तपासातून हे वास्तव समोर आले असून या विधीसंघर्ष बालकांकडून त्यांनी चोरलेले १५ ग्रॅम वजनाचे गंठण मंगळवारी (दि. २६) जप्त करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील विराट नगर परिसरातील एक महिला तिच्या घरासमोर १९ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास शतपावली करीत होती. यावेळी काही मुले तिथे आली व त्यांनी या महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावून पळ काढला. या प्रकरणी संबधीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीविरुध्द विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिस अधिक्षक सोमय मुंडे व अपर पोलिस अधिक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात या चोरीचा तपास पथक करीत होते. दरम्यान तीन मुले चोरीचे गंठण विकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली व ते तेथे पोहचले त्यांनी या मुलांना ताब्यात घेवून त्यांची विचारपुस केली असता त्यांनी गंठणचोरीची कबुली दिली. ही मुले लातुरातील एका खासगी वस्तीगृहात राहतात मोबाईल खरेदी व मोजमजेसाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनात सपोनि एन.डी. लिंगे हे करीत आहेत.
गंठण चोरीचा तपास पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर , तपास अधिकारी नाना लिंगे तसेच त्यांचे पथक बारकाईने करीत होते. विशेष म्हणजे चोरी गेलेले गंठण विकले जाईल असा त्यांचा तर्क होता त्यामुळे त्यांनी शहरातील सराफा व्यापाऱ्यांना कळवून असे कोणी आले तर त्यांना कळवण्याचे निर्देश दिले होते. विवेकानंद पोलिस ठाण्याची ही समयसुचकता सत्यात उतरली. ती मुले गंठण विक्रीसाठी सराफांकडे आली त्यांनी पोलिसांना कळवले अन गंठण हाती लागले.