

30 percent of farmers in Marathwada are deprived of assistance
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टीवाधित शेतकऱ्यांच्या बैंक खात्यावर दिवाळीपूर्वी आर्थिक मदत जमा करण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला होता. परंतु महसुली यंत्रणेच्या कासवगतीमुळे अद्यापही या मदतीचे वाटप पूर्ण होऊ शकलेले नाही. सुमारे ३० टक्के शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत मिळणे बाकी आहे.
यंदा अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील ३२ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे राज्य सरकारने एकूण एक कोटी सहा लाख ४५ हजार शेतकऱ्यांसाठी आठ हजार ७०८ कोटी रुपयांची मदत जाहीर केली. तीन डिसेंबरपर्यंत यातील ७०.४२ टक्के म्हणजेच एकूण सहा हजार १२७ कोटी ६३ लाखांची मदतच वाटप झाली आहे. एकूण ८२ लाख ९१ हजार ३९५ शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली आहे.
राज्य सरकारने वेळो-वेळी शासन निर्णय निर्गमित करून मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आठ हजार ७०८ कोटी रुपयांची मदत जाहीर केली. मदतीसाठी तीन डिसेंबरअखेर ८८ लाख ३० हजार ६९६ शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या आहेत. याद्या अपलोड करण्याचे ७४ टक्के काम पूर्ण झाले आहे. परंतु वहुतांश शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅक फार्मर आयडी काढलेला नाही, तसेच ई-केवायसीही केलेली नाही. मदतीसाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. ई-केवायसी अभावी अद्यापही चार लाख तीन हजार ६२६ शेतकऱ्यांना २३५ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले नसल्याचे चित्र आहे.