छत्रपती संभाजीनगर : पैशांसाठी बहिणीने भावाची केली हत्या; ११ आरोपी ताब्यात | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : पैशांसाठी बहिणीने भावाची केली हत्या; ११ आरोपी ताब्यात

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : दहा लाख रुपयांसाठी सख्ख्या बहिणीने गुंडांकरवी भावाचे अपहरण करून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. बेगमपुरा ठाण्यात कट रचून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ११ संशयीत आरोपींना अकोला जिल्ह्यातील अकोट येथून ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक आम्रपाली तायडे यांनी दिली.

जगदीश ज्योतिष फत्तेलष्कर (वय ४०, रा. मनपा शाळेसमोर, बेगमपुरा), असे मृताचे नाव असून त्यांची पत्नी किरण जगदीश फत्तेलष्कर (वय ३७) या फिर्यादी आहेत. रिना राजेश यादव, रितेश रामलाल मंडले ऊर्फ यादव, रमाबाई रामलाल मंडले, लखन, गोलू आणि इतरांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

अधिक माहितीनुसार, जगदीश हे पत्नी, दोन मुले, आई-वडील, भाऊ, भावजयी आदींसह राहत होते. सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या मुलीचा विवाह झाला. त्या विवाहासाठी त्यांनी रिना यादव हिच्याकडून एक लाख रुपये घेतले होते. त्या पैशांवरून त्यांच्यात वादावादी सुरु होती. ३१ ऑक्टोबरला आरोपी रिना, रितेश, रमाबाई आणि त्यांच्यासोबतचे गुंड घरात घुसले. त्यांनी जगदीश यांना थेट दहा लाख रुपयांची मागणी करून पैशांसाठी धमकावले. आत्ताच पैसे पाहिजेत, असे म्हणत त्यांनी जगदीश यांना शिवीगाळ केली. तेव्हा त्यांच्यात समझोता झाला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी १ नोव्हेंबरला दुपारी २ वाजता पुन्हा रिना, रितेश आणि इतर आले. त्यांनी पुन्हा दहा लाखांची मागणी केली. आमची रजिस्ट्री होऊ द्या, लगेच पैसे देऊ, असे जगदीश व त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. मात्र, रिना व इतरांनी कोणाचेही काही ऐकले नाही. जगदीश यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. कुटुंबियांना डोळ्यात चटणी टाकून मारून जीवे टाकण्याची धमकी दिली.

कारमधून अपहारण

मारहाण करीत असतानाच आरोपी रितेश, लखन, गोलू आणि इतरांनी जगदीश फत्तेलष्कर यांना बळजबरी कारमधून त्यांचे अपहरण केले. जीवे मारण्याच्या उद्देशानेच त्यांचे अपहरण केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यानंतर काही वेळाने जगदीश यांचा भाऊ योगेश यांनाही बाँड करण्यासाठी म्हणून बुलेटवरून आरोपी घेऊन गेले. त्यांच्याकडून एक महिन्यात पैसे परत करण्याचा बाँड लिहून घेतला. त्याच दिवशी सायंकाळी मकाई गेटजवळ खाम नदीत जगदीश यांचा मृतदेह आढळला. त्यावरून सर्व आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक हरेश्वर घुगे करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button