छ.संभाजीनगर: मोटारसायकल घसरून हतनुर येथील तरूण ठार | पुढारी

छ.संभाजीनगर: मोटारसायकल घसरून हतनुर येथील तरूण ठार

नाचनवेल, पुढारी वृत्तसेवा: कन्नड तालुक्यातील पिशोर ते नाचनवेल मार्गावर मोहाडी गावानजीक असलेल्या साई दरबार हॉटेलजवळ पुलावरून मोटरसायकल स्लिप होऊन तरुणाचा मृत्यू झाला. सोमीनाथ कडूबा केवट (वय २५, ह.मु. हतनुर, ता. कन्नड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोमीनाथ केवट बुधवार हतनूर येथून आपल्या (एमएच २० ईव्ही ६५३९) दुचाकीवरून बहिणीला भेटायला व आईला आणण्यासाठी टाकळी खुर्द (ता. सिल्लोड) येथे जात होते. यावेळी मोहाडी गावाजवळ हॉटेल साई दरबार जवळ पुलाजवळ गाडी स्लीप होऊन ते पुलाच्या खाली झाडीत कोसळले. ही बाब कुणाच्याच लक्षात न आल्याने दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास मोहाडी येथील शेतकरी शेतात कामाला आल्यावर झुडपात मोबाईलचा आवाज त्यांच्या कानी पडला. त्यांना मोटारसायकल व तरुण दिसून आला.

त्यांनी तत्काळ पिशोर पोलीस ठाण्यात घटनेविषयी माहिती कळविली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कोमल शिंदे यांनी घटनास्थळी दाखल झाल्या. बीट अंमलदार लालचंद नागलोत यांनी पंचनामा केला. नाचनवेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केले. हतनूर येथे सायंकाळी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा 

Back to top button