छत्रपती संभाजीनगर : भाडेकरूनेच घोटला वृद्धेचा गळा

छत्रपती संभाजीनगर : भाडेकरूनेच घोटला वृद्धेचा गळा
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : चोरी करण्यासाठी घरात घुसलेल्या भाडेकरूने हातपाय बांधून वृद्धेचा गळा दाबून खून केला. पैठण गेट परिसरातील शारदाश्रम कॉलनी येथे काल (दि.४) रात्री ही घटना घडली. वृद्धेचा गळा घोटल्यानंतर आरोपीने घरात पैशांचा शोध घेतला. मात्र, पैसे असलेले कपाट त्याला उघडता आले नाही. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली.

अलका गोपालकृष्ण तळणीकर (७२, रा. शारदाश्रम कॉलनी, पैठण गेट परिसर) असे मृत वृद्धेचे तर अशोक गणेश वैष्णव (३२, रा. डोणगाव, ह.मु. शारदाश्रम कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. अशोक अविवाहित असून त्याचे नातेवाईक खोकडपुरा येथे राहतात. तो टेम्पो ट्रॅव्हल्सचालक म्हणून काम करतो. अधिक माहितीनुसार, अलका तळणीकर आणि त्यांचा मुलगा अनिल तळणीकर हे दोघे शारदाश्रम कॉलनीत प्लॉट क्र. २१ मधील श्री निवास बिल्डींगमध्ये राहातात. येथे काही विद्यार्थी आणि अशोक वैष्णव हे भाडेकरू म्हणून राहतात.

वैष्णव हा दोन वर्षांपासून भाडेकरू म्हणून राहतो. ४ ऑक्टोबरच्या रात्री तिवारी यांनी अलका यांच्या नातेवाईकांना फोन करून अलका तळणीकर हातपाय बांधलेल्या अवस्थेत असल्याची माहिती दिली. त्यानंतर विशाल पांडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी अलका यांना मृत घोषित केले.

अशी उघड झाली खुनाची घटना

आरोपी अशोक आणि मृत अलका यांच्यात झटापट झाली. तेव्हा, अलका यांच्या मोबाइलचे बटन दाबून अजिंक्यला फोन लागला होता. मात्र, बोलणे झाले नव्हते. त्यामुळे अजिंक्यने माघारी कॉल केले, पण अलका फोन उचलू शकल्या नाहीत. यामुळे अजिंक्यने लगेचच अशोकला फोन करून मावशी फोन उचलत नाही, घरात जाऊन पाहा, असे सांगितले. त्यावेळी अशोक तेथेच होता. तरीही त्याने थोडा वेळ लावून त्यांना पाहायला गेल्याचे नाटक केले. यानंतर त्याने ही माहिती मेसचालक शंकर तिवारी यांना दिली. तिवारींनी यांनी लगेचच ही माहिती अलका यांचे मावस भाऊ विशाल पांडे यांना कळवली.  यानंतर तत्काळ ते घटनास्थळी आले.

अन् अशोक वैष्णवची नियत फिरली

अशोक वैष्णव आणि अजिंक्य तळणीकर हे मित्र आहेत. काही दिवसांपूर्वी अजिंक्यने अशोकला घरात बोलावून पैसे मोजायला दिले होते. त्यावरून यांच्या घरता खूप पैसा आहे, याबाबत अशोकला अंदाज आला होता. तसेच, त्यांची एक संपत्तीही नुकतीच विक्री केल्याचे त्याला समजले होते. त्यामुळेच अजिंक्य बाहेर असल्याची संधी साधून तो चोरी करण्यासाठी अलका यांच्या घरात घुसला, मात्र त्याचा डाव फसला.

अलका यांचा २५ वर्षांपूर्वी घटस्फोट

मृत अलका तळणीकर यांच्या पतीचे नाव राजेश परदेशी असून त्यांना एक मुलगा आहे. २५ वर्षांपूर्वी अलका आणि राजेश यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर परदेशी हे मुलासह शिरढोण (ता. कळंब, जि. धाराशिव) येथे राहतात. तर अलका या माहेरी शारदाश्रम कॉलनीत राहत होत्या. अलका यांचा एक भाऊ अमेरिकेत अभियंता आहे. दुसरा भाऊ पुण्यात वकिल आहे.

अजिंक्य हा अलका यांच्या बहिणीचा मुलगा आहे. तो लहान असतानाच बहिणीचे निधन झाले होते. त्यामुळे त्याला अमेरिकेतील भावाने दत्तक घेतले आहे. तो अलका यांच्याकडेच राहायचा. त्यांचा मानलेला मुलगा, अशी त्याची ओळख आहे. घटनेच्या दिवशी मुंबईला गेला होता.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news