

60 people, including a 105-year-old freedom fighter, go on indefinite hunger strike
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : विनामोबदला ताब्यात घेतलेल्या जमिनी परत करा यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी वयोवृद्ध असलेले १०५ वर्षीय स्वातंत्र्यसैनिक उत्तम निवृत्ती कुडके हे रविवार (दि.१४) पासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेदमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासोबत वयोवृद्ध विधवा महिला व इतर अशा ६० जणांचा समावेश आहे.
शासनाने विविध उपक्रमांसाठी १७ हजार २५३ एकर जमिनी विनामोबदला ताब्यात घेतल्या आहेत. त्या तात्काळ परत करावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याने यासह मरनोत्मुख स्वातंत्र्यसैनिकांना सन्मान, राजस्थान सरकार प्रमाणे मानधन, निवासासाठी १० लाख रुपये, पाल्यांना नोकरीत आरक्षण, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा यासह इतर मागण्यांबाबत १४ सप्टेंबरपासून विभागीय आयुक्त कार्यालयांसमोर हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.
या उपोषणात ६० जणांचा समावेश आहे. प्रथमच एवढे वयोवृद्ध स्वातंत्र्यसैनिक बेमुदत उपोषणास बसल्यामुळे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली आहे. जोपर्यंत यावर निर्णय होणार नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार कुडके यांनी केला आहे.