

City water supply affected by heavy rains
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जोरदार पावसाचा शहर पाणीपुरवठ्याला फटका बसला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन जायकवाडी पंपगृहात रविवारी (दि.१४) मध्यरात्री ट्रान्सफॉर्मर व कॅपॅसिटर पॅनलमध्ये स्पार्क झाल्याने १००, ५६ व २६ दललि योजनेचा पाणीपुरवठा तब्बल १६ तास बंद राहिल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, पाणीपुरवठ्याचे टप्पे एक दिवसाने पुढे ढकलण्यात आले आहेत.
शहरात पाच ते सहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडून काळजी घेतली जात आहे. मात्र रविवारी मध्यरात्री २ वाजता मुसळधार पावसात जायकवाडी येथील पंपगृहाचा अचानक विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीत ट्रान्सफॉर्मर क्र. ३ वर बुकोल्ज अलार्म आढळला. सुरुवातीला अलार्म रिसेट करून पुरवठा सुरळीत करण्यात आला.
मात्र अवघ्या २५ मिनिटांतच ट्रान्सफॉर्मर आणि कॅपॅसिटर पॅनलमध्ये स्पार्क होऊन आरएमयु युनिट ट्रिप झाले. त्यामुळे १०० व ५६ दललि योजना ठप्प झाली. पंपगृह परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे त्याची दुरुस्ती करणे शक्य झाले नाही. पाऊस ओसल्यानंतर पहाटे सव्वापाच वाजता जुने पंपगृह कार्यान्वित करण्यात आले. मात्र तपासणीत ट्रान्सफॉर्मर क्र. ३ मधून तेल फेकल्या गेले.
तसेच इनकमर क्र.३ च्या फोर पोल स्ट्रक्चरवरील दोन डी.ओ. शॉर्ट झाल्याचे आढळून आले. दरम्यान, पावसातील ओलसरपणामुळे सी.टी. पी.टी., व्ही.सी.बी., बस बारसह महत्त्वाची उपकरणे बाधित झाली होती. त्यामुळे महापालिकेच्या अभियंत्यांनी युद्धपातळीवर काम करून खराब ट्रान्सफॉर्मरची केबल नवीन ट्रान्सफॉर्मरला जोडली. हे काम संध्याकाळी पावणेसहा वाजता पूर्ण झाले. त्यानंतर १०० व २६ दललि योजनेवरील पंपिंग पूर्ववत करण्यात आले. या दरम्यान ५६ दललि योजना ४ तास तर १०० व २६ दललि योजना तब्बल साडेसोळा तास बंद राहिल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून, शहराला होणारा पाणीपुरवठा बंद होता.
जायकवाडी येथील पंपगृहचा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे तिन्ही योजनेचे पाणी बंद झाले आहे. पाणी बंद होऊन साडेसोळा तासांचा कालावधी उलटला आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे जलकुंभ कोरडे झाले आहेत. पाईपलाईनला सब-वे करूनही पाणीपुरवठा करण्यास 0 अडचणी येत आहेत. विद्युत पुरवठा सुरू झाल्यानंतरही शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी दोन ते अडीच तास लागतील. सध्या सुरू असलेले टप्पे बंद पडले असून, पाणी सुरू झाले तरी उशिराने हे टप्पे पूर्ण केले जातील. मात्र या पुढचे टप्पे देताना मनपा यंत्रणेची धावपळ उडणार आहे. त्यामुळे राहिलेले टप्पे एक दिवस पुढे ढकलले जाण्याची शक्यता अभियंत्यांनी व्यक्त केली आहे.