

Rains again in Marathwada, gates of Jayakwadi opened; Godavari floods
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
शनिवारी आणि रविवारी छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १०, तर विभागात एकूण ३२ सर्कलमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. शहरासह मराठवाड्यात पुढील दोन दिवररांत पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पावसामुळे जायकवाडीसह अन्य प्रकल्पांचे दरवाजे उघडल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.
गेवराई, अंबड तालुक्यात जवळपास तीस गावांचा संपर्क तुटला आहे. काही दिवसांपासून पावसाने उघडिप दिल्यामुळे तापमानात वाढ झाली होती. आता पुन्हा पाऊस सुरू झाल्यामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत काही ठिकाणी कमी वेळेत जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोमवार, १५ सप्टेंबरपर्यंत विशेषतः छत्रपती संभाजीनगरसह परभणी, बीड आणि जालना या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तत्पूर्वी रविवारी विभागात पावसाने जोरदार बंटिंग केली. यात संभाजीनगर जिल्ह्यातील १०, जालन्यातील ५, बीडमधील ७, लातुरातील ७, धाराशिव, हिंगोलीतील प्रत्येकी १ तर नांदेड जिल्ह्यातील दोन असे एकूण ३२ सर्कलमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हवामान विभागाने सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला आहे.
मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान होताच सर्वत्र पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. औरादला ढगफुटीसदृश्य पाऊस औराद शहाजानी परिसरात रविवारी सायंकाळी ढगफुटीसदृष्य पाउस झाला. एका तासात तासात ५६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर पुन्हा रात्री शहराला पावसाने झोडपले, जूनपासून आतापर्यंत ५८९ मिमी पाऊस झाल्याची नोंद हवामान केंद्रात झाली आहे.
जालन्यात पुलावरून पाणी जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातील मालेवाडी येथे तीन कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. घनसांगी तालुक्यातील बाणेगाव येथे बोज पडून जनावराचा मृत्यू तर परतूर तालुक्यातील सावरगाव बुद्रुक येथे पूलावरून पाणी वाहत असून गावाचा संपर्क तुटला आहे. सावंगी किनार येथे पुलाखालून ३ फूट पाणी वाहत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक बंद करण्यात आली आहे. महसूल यंत्रणा घटनास्थळी तैनातकरण्यात आली आहे. घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी, मंगरुळ येथील तलावाचेएक दोन स्वयंचलित दरवाजे वरखाली होताना तांत्रिक अडचणी येत आहेत.