

515 teachers of Zilla Parishad have been appointed as additional teachers.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : संच मान्यतेच्या नव्या निकषांमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमधील तब्बल ५१५ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मात्र जिल्ह्यात पुरेशी पदे रिक्त नसल्याने या शिक्षकांना शाळांविनाच राहावे लागणार आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन त्या प्रमाणात शिक्षकांच्या पदांची निश्चिती केली जाते. यंदा संचमान्यतेची प्रक्रिया १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार करण्यात येत आहे. शासनाने यावेळी संचमान्यतेच्या निकषात बदल केला आहे. नव्या निकषांनुसार सन २०२४- २५ ची संचमान्यता नुकतीच करण्यात आली. स्टुडन्ट पोर्टलवर व्हॅलिडेट आधार क्रमांक अपडेट केलेल्या विद्यार्थी संख्येवर ही संचमान्यता करण्यात आली आहे. शिक्षकांचे प्रमाण निश्चित करण्यासाठी पटसंख्याही बदलण्यात आली आहे. त्याचा फटका शिक्षकांना बसला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नवीन संचमान्यतेमुळे तब्बल ५१५ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत.
गतवर्षी जिल्ह्यात शिक्षकांची एकूण ८३०५ पदे मंजूर होती. नवीन निकषांमुळे ही पदसंख्या ५०५ ने कमी होऊन ७हजार ८६४ पर्यंत खाली आहे. त्यात ५१५ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. गतवर्षी जिल्हा परिषद शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त होती. मध्यंतरी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुमारे एक हजार नवीन शिक्षकांची नियुक्ती झाली. हे सर्व शिक्षक रुजू झाले. आता पटसंख्येचे निकष बदलल्याने आणि केवळ आधार व्हॅलिडीची झालेल्या विद्यार्थ्यांचीच संख्या गृहीत धरल्याने जिल्ह्यातील शिक्षकांची पदे घटली आहेत. परिणामी अनेक शिक्षकांवर अतिरिक्त ठरण्याची वेळ आली आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची कार्यवाही केली जाणार आहे.
खासगी शाळांचेही दीडशे शिक्षक अतिरिक्त
जिल्हा परिषद शाळांप्रमाणेच खासगी शाळांमधील शिक्षक संख्या कमी झाली आहे. खासगी शाळांतील सुमारे १५० शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. एवढ्या प्रमाणात जिल्ह्यात शिक्षकांची पदे शिल्लक नसल्याने अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना जिल्ह्याबाहेर बदली घेऊन जावे लागणार आहे. इतर जिल्ह्यातही अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढली असल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.