

Rajendra Janjal, district chief of Shinde's Shiv Sena Guardian Minister Sanjay Shirsat Political controversy
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याविरोधात उपसलेली तलवार तूर्तास म्यान केली आहे. जंजाळ यांनी बुधवारी (दि.२६) रात्री विमानतळावर पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेत आपले गाऱ्हाणे मांडले. त्यावर एकनाथ शिंदे यांनी नगरपरिषद निवडणुकांनंतर खासदार श्रीकांत शिंदे यांना संभाजीनगरात पाठविण्याचे आश्वासन दिले.
शिवसेनेत स्थानिक पातळीवर गृहकलह निर्माण झाला आहे. पक्षाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी त्यांच्याच पक्षाचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर टीकेची झोड उठविली. शिरसाट हे मनमानी पदध्तीने पक्ष चालवत आहेत. जिल्हाप्रमुख असूनही आपल्याला पक्ष कार्यात विचारात घेत नाहीत, माझ्या बैठकांना कार्यकर्त्यांनी येऊ नये यासाठी ते कार्यकर्त्यांना धमकावतात, असे जंजाळ यांनी म्हटले होते.
तसेच ते शिरसाटांविरोधात पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी मुंबईला गेले होते. मात्र शिंदे मुंबईत नसल्याने ते मंगळवारी शहरात परतले. बुधवारीही त्यांनी दिवसभर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मंत्री शिरसाट यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईकडे जाण्यासाठी चिकलठाणा विमानतळावर आले होते.
यावेळी रात्री उशिरा जंजाळ यांनी शिंदे यांची भेट घेत आपले गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे हेही तिथे पोहोचले. दोघांकडेही जंजाळ यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. त्यावर शिंदे यांनी नगरपरिषद निवडणुका झाल्यानंतर श्रीकांत शिंदे या विषयात लक्ष घालण्यासाठी संभाजीनगरात येतील, असे सांगितले. शिंदेंच्या या आश्वासनानंतर जंजाळ यांनी तूर्तास आपली तलवार म्यान केल्याचे समजते.
माझी नाराजी कार्यकर्त्यांसाठी...
माझी नाराजी वैयक्तिक स्वरूपाची नव्हती. मला डीपीसीचा निधी मिळाला नाही किंवा माझे काही काम झाले नाही म्हणून मी नाराज नव्हतो. पक्षाच्या पडत्या काळात जे कार्यकर्ते आपल्यासोबत होते, त्यांच्यावर अन्याय होऊ नये ही माझी भावना आहे. त्यामुळे मी एकनाथ शिंदे यांच्या कानावर सर्व प्रकार घातला. जिल्ह्यात पक्ष वाढविला पाहिजे. पक्ष वाढीसाठी भरपूर स्कोप आहे, पण कुठे जिथे पक्ष संघटना कमकुवत आहे तिथे ती वाढविली पाहिजे, ज्या प्रभागात पक्षाचे प्रबळ कार्यकर्ते आहेत तिथे नव्यांना आणून त्यांच्या डोक्यावर बसविणे चुकीचे आहे. मी सहा महिन्यांत सहा वेळा पालकमंत्र्यांशी या विषयावर बोललो, परंतु त्यांच्या कार्यपद्धती तशीच आहे. म्हणून मी एकनाथ शिंदे यांना सर्व प्रकाराची माहिती दिली, असे राजेंद्र जंजाळ यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.
घोडेले, तुपेंना बोकांडीवर घ्यायचे का ?
पक्षात नव्याने आलेले माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि त्र्यंबक तुपे यांच्याविषयीही जंजाळ यांनी नाराजी व्यक्त केली. लोकसभा, विधानसभा निवडणुकीवेळी नंदकुमार घोडेले आणि त्र्यंबक तुपे यांनी आमच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांना प्रचंड त्रास दिला. वॉर्डात प्रचाराला गेल्यावर त्यांनी वेगवेगळ्या अडचणी उभ्या केल्या. तरीही आमच्या कार्यकत्यांनी तेथून आमच्या पक्षाला मताधिक्य मिळवून दिले. आता ते आमच्या पक्षात आले आहेत. त्यांना बोकांडीवर घ्यायचे का? असा सवालही राजेंद्र जंजाळ यांनी उपस्थित केला आहे.