

4,000 medical facilities in the district closed, patients' plight
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री विरोधात पुकारलेल्या देशव्यापी संपात सहभागी होत शहरातील औषधी विक्रेत्यांनी बुधवारी (दि.२०) कडकडीत बंद पाळला. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून काही मोठ्या रुग्णालयांमधील मेडिकल स्टोअर्सना आतून अत्यावश्यक औषधी विक्रीची मुभा दिली होती. मात्र शहरासह जिल्ह्यातील ४ हजारांहून अधिक मेडिकल दिवसभर बंद ठेवण्यात आल्याने शेकडो रुग्णांची हेळसांड झाली. फोनाफोनी, धावाधाव आणि शोधाशोध करूनही गोळ्या-औषधी न मिळाल्याने अनेक रुग्ण-नातेवाइकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट संघटनेकडूनही मेडिकल बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास शहरासह जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी प्रतिसाद देत बुधवारी त्यांचे मेडिकल स्टोअर बंद ठेवले. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून औषधी भवन येथे आपत्कालीन औषधींसह टास्क फोर्स नियुक्त होते. दरम्यान, जिल्हा संघटनेच्या वतीने सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
यात सहभागी औषध विक्रेत्यांनी हातात फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी जर्नाधन विधाते यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष नितीन देशमुख, नंदू काळे, निखील सारडा, किरण जोशी, मनोहर कोरे, हरीष काबरा, बापू जगदाळे, सय्यद अहझानउल्ला यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
सर्वसामान्य रुग्णांना फटका
केमिस्ट असोसिएशनच्या बंदचा फटका सर्वसामान्य रुग्ण, नागरिकांना तसेच बाहेर जिल्ह्यांतून आलेल्या रुग्णांनाही बसल्याचे दिसून आले. मेडिकल बंद असल्याने अनेक रुग्ण, नातेवाईक चिठ्ठ्या घेऊन इकडे-तिकडे फिरत होते. मेडिकल हब शहरात उपचारासाठी बाहेर जिल्ह्यातून आलेल्यांनाही या संपामुळे औषधी मिळत नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
सुमारे २० कोटींची उलाढाल ठप्प
शहरातील सुमारे तीन हजार मेडिकल, तर ग्रामीण भागातील एक हजार अशा एकूण ४ हजारांहून अधिक मेडिकल स्टोअर्स बुधवारी दिवसभर बंद होते. ४५० होलसेल औषध व्यावसायिकही या बंदमध्ये सहभागी झाल्याने दिवसभरात १५ ते २० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचे अध्यक्ष नितीन देशमुख यांनी सांगितले.
घाटीत औषधीसाठी गर्दी
खासगी मेडिकल चालकांनी बंद पुकारला असताना घाटी रुग्णालयातील औषधालय नियमित वेळेनुसार सुरू होते. मोफत औषधीमुळे येथे रुग्णांची गर्दी वाढली आहे. त्यात बुधवारी बाहेर मेडिकल बंद असल्याने अनेक रुग्णांनी घाटीत तपासणी करून गोळ्या औषधी मिळवली.