

3,000 beneficiaries paid their own share under the PM Awas Yojana
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: पंतप्रधान आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यातील ३ हजार ४०४ घरांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता लाभार्थ्यांच्या स्वहिस्स्यावर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या आठ दिवसांत तब्बल एक हजार लाभार्थ्यांनी घराच्या किमतीतील १० टक्के स्वहिस्सा जमा केला आहे. अजून सुमारे ४०० लाभार्थ्यांकडून रक्कम भरणे बाकी असून, त्यांच्याशी प्रशासनाकडून दूरध्वनीवरून संपर्क साधला जात आहे. यात प्रतीक्षा यादीतील नागरिकांनाही संधी असून त्यांच्याशीही संपर्क करण्यात येत असल्याची माहिती गुरुवारी आयुक्त अमोल येडगे यांनी दिली.
केंद्र व राज्य शासनाने स्वहिस्सा भरण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत निश्चित केली होती. मात्र, ऑनलाइन पोर्टल अद्याप सुरू असल्याने रक्कम भरण्यासाठी लाभार्थ्यांना आणखी चार ते पाच दिवसांची संधी उपलब्ध झाली आहे. या कालावधीत उर्वरित लाभार्थ्यांकडून स्वहिस्सा जमा करून घेण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात ३ हजार ४०४ घरे प्रस्तावित असून, आतापर्यंत सुमारे तीन हजार लाभार्थ्यांनी १० टक्के स्वहिस्सा भरला आहे. स्वहिस्सा न भरलेल्या सुमारे ४०० लाभार्थ्यांबरोबरच प्रितक्षा यादीतील सुमारे ७०० नागरिकांशीही प्रशासन संपर्क साधत आहे.
घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक रक्कम भरण्याचे आवाहन त्यांना केले जात आहे. दरम्यान, गेल्य आठवड्यात स्वहिस्सा भरण्याच्या प्रक्रियेला मोठी गत मिळाली. अवघ्या आठ दिवसांत एक हजार नागरिकांनी रक्कम जमा केल्याने पहिल्या टप्प्याचे उद्दिष्ट पूर्ण होण्याच प्रशासनाला आशा आहे. तसेच पुढील तीन ते चार दिवसांत उर्वरित लाभार्थीही स्वहिस्सा भरतील, अशी अपेक्षा आयुक्त अमोल येडगे यांनी व्यक्त केली.
दुसऱ्या टप्प्याची लवकरच प्रक्रिया करणार सुरू
पहिल्या टप्प्यातील सुमारे ३ हजार ४०० घरांचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर पीएम आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची लवकरच प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून केंद्र आणि राज्य शासनाकडे सादर केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील काही उर्वरित घरांचाही दुसऱ्या टप्प्यात समावेश करण्याची शक्यता आहे.